प्रतीक्षा पारखी, प्रतिनिधी
बारामती लोकसभा निवडणुकीकडं यंदा संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार झाल्यानं निवडणूक अटीतटीची होईल असा सर्वांचा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार 333 मतांनी मोठा विजय मिळवला. सलग चौथ्यांदा बारामतीच्या खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी अजित पवारांबद्दलही सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला, त्याला त्यांनी उत्तर दिलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय दिलं उत्तर?
बारामती लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांना काय सल्ला देणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर 'मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो', असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं.
इंडिया आघाडीचे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. या विजयानं जबाबदारी खूप वाढली आहे. उद्यापासून दुष्काळी दौरा सुरु करणार आहे. चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
... तर साताराची जागाही जिंकली असती
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी बारामतीप्रमाणेच साताऱ्याची जागाही प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत भाजपाचे उदयनराजे भोसले विजयी झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे 32 हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय गाडे यांचं चिन्ह पिपाणी होतं. त्यांचं चिन्हाचं तुतारीशी साधर्म्य होतं. त्यामुळेच कदाचित त्यांना तिसऱ्या क्रमांकाची तब्बल 37 हजार 062 मतं मिळाली. ही मतं शशिकांत शिंदे यांच्या पराभवात निर्णायक ठरली.
( नक्की वाचा : साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर )
सुप्रिया सुळे यांनी देखील पुण्यात पत्रकारांशी बोलताना हाच मुद्दा मांडला. पिपाणीचं चिन्ह असतं तर साताऱ्याची जागाही जिंकली असती, असं त्यांनी सांगितलं. दिंडोरीमध्येही पिपाणीनं मोठी मतं घेतली, हा रडीचा डाव असल्याची टीका त्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world