योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' सिनेमात ज्याप्रमाणे बनावट सीबीआय अधिकारी बनून धाड टाकली जाते आणि कोट्यवधी रुपये लुटले जातात, अगदी तसाच थरार अकोला जिल्ह्यात प्रत्यक्ष घडला आहे. स्वतःला सीबीआय अधिकारी सांगत आलेल्या काही ठगांनी एका व्यापाऱ्याला गाठले आणि त्याच्याकडून तब्बल 25 लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली.
या फिल्मी स्टाईल लुटीमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अकोला पोलिसांनी तत्परतेनं अवघ्या 12 तासांत या हायव्होल्टेज प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. खामगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्याला दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी लक्ष्य केले होते. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस यंत्रणा जागी झाली. बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 468/2026 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्यापाऱ्याची लुटलेली मोठी रक्कम लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) तपासाचे आदेश देत तात्काळ विशेष पथके मैदानात उतरवली.
( नक्की वाचा : Kalyan News: चेन स्नेचिंग करणाऱ्या कल्याणच्या इराणी टोळ्या आता ड्रग्स धंद्यात; महिलांचाही सहभाग वाढल्याने खळबळ )
50 सीसीटीव्ही आणि 12 तास
पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची 3 स्वतंत्र पथके रात्रीतूनच कामाला लागली. सिनेमात गुन्हेगार निसटतात, पण इथे पोलिसांनी तांत्रिक तपासाचा अचूक वापर केला. तपास पथकांनी खामगाव ते बाळापूर दरम्यानच्या संपूर्ण मार्गावरील तब्बल 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर पोलिसांनी केवळ 12 तासांत संशयितांची ओळख पटवली. हार्दिक मनोजकुमार गुरबानी (वय 22) आणि साहिल नंदकिशोर नथ्थानी (वय 25) अशी या तोतया सीबीआय अधिकाऱ्यांची नावे असून हे दोन्ही आरोपी खामगावचेच रहिवासी निघाले. पोलिसांनी अचूक सापळा रचून या दोघांनाही खामगावमधून अटक केली.
( नक्की वाचा : Akola News: अकोल्यात सायबर ठगांची भयंकर नवी शक्कल! QR कोडवर पाठवला 1 रुपया आणि 60 हजार घेऊन पसार )
संपूर्ण 25 लाख जप्त
अकोला पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लुटीची 100 टक्के रक्कम परत मिळवली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून व्यापाऱ्याचे लुटलेले संपूर्ण 25 लाख रुपये रोख आणि त्यांचा 10 हजार रुपयांचा अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि त्यांचे 2 मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. असा एकूण 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवघ्या 12 तासांत दाखवलेल्या या सिंघम स्टाईल कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासाठी 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता बाळापूर पोलीस करत असून, या तोतया अधिकाऱ्यांनी आणखी कुठे अशा धाडी टाकल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.