Kalyan News: कल्याण परिसरातील गुन्हेगारी जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सोनसाखळी चोरी आणि लुटमारीसाठी देशभरात कुप्रसिद्ध असलेली आंबिवली येथील इराणी वस्ती आता एका नव्या आणि भयंकर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे उघड झाले आहे. कल्याण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एका इराणी ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. या कारवाईमुळे इराणी टोळ्यांनी आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या ड्रग्स रॅकेटमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिसांनी कल्याणजवळील वडवली परिसरात सापळा रचून अब्बास इराणी नावाच्या तस्कराला ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि आरोपीमध्ये जोरदार झटापट झाली.
मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला जागेवरच पकडले. या आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 14 लाख रुपयांचे एमडी ड्रग्स सापडले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे. अब्बास इराणी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने हे ड्रग्स कोणाकडून आणले होते आणि तो ते कल्याण परिसरात कोणाला विकणार होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : Kalyan News: मॉर्निंग वॉकला गेलेले 100 हून जास्त वृद्ध नदी घाटावरच अडकले; मुजोर बिल्डरची धक्कादायक कृती )
चष्मे विक्री ते ड्रग्स तस्करी
आंबिवली येथील इराणी वस्तीचा गुन्हेगारी इतिहास पाहिला तर त्यांचे बदलते स्वरूप थक्क करणारे आहे. काही वर्षांपूर्वी या वस्तीतील लोक सुरुवातीला चष्मे, फण्या आणि आरसे विकण्याचा व्यवसाय करायचे. त्यानंतर हळूहळू त्यांनी पाकीटमारी आणि घरफोड्यांकडे आपला मोर्चा वळवला.
गेल्या 15 वर्षांपासून तर या वस्तीतील तरुणांनी देशभरात सोनसाखळी चोरी म्हणजेच चेन स्नेचिंगचे जाळे पसरवले होते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे पोलीस या वस्तीत कारवाई करायला घाबरायचे. पोलिसांनी यापूर्वी अनेकदा या वस्तीवर कोम्बिंग ऑपरेशन करून शेकडो इराणी गुन्हेगारांना तुरुंगात डांबले आहे. अनेकांवर मोक्का सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई देखील झाली आहे. मात्र, आता चेन स्नेचिंगमध्ये पोलिसांचा धाक वाढल्यामुळे की काय, या टोळ्यांनी थेट सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या ड्रग्स व्यवसायात उडी घेतली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड )
इराणी महिलांचाही ड्रग्स व्यवसायात सहभाग
या नव्या गुन्हेगारी ट्रेंडचे सर्वात चिंताजनक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पुरुषच नव्हे तर इराणी वस्तीतील महिलांचाही या ड्रग्स तस्करीत मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अनेक इराणी महिलांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
पुरुष गुन्हेगार तुरुंगात गेल्यानंतर किंवा पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर, महिलांचा वापर करून हे ड्रग्स नेटवर्क चालवले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता आंबिवलीची ही संपूर्ण इराणी वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली असून तिथे गुप्त नजर ठेवली जात आहे.
दीड वर्षात 130 तस्करांवर कारवाई
कल्याण परिमंडळ ३ च्या पोलिसांनी गेल्या दीड वर्षांपासून अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध एक मोठी मोहीम उघडली आहे. कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातून ड्रग्सचाळ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी आपले जाळे विणले आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत पोलिसांनी विविध कारवायांमध्ये तब्बल 130 पेक्षा जास्त आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या मोहिमेदरम्यान कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स, गांजा, चरस आणि इतर घातक अमली पदार्थांसह तस्करांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अब्बास इराणीच्या अटकेनंतर आता या इराणी वस्तीतील ड्रग्सच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world