योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोला शहरातील तारफायल परिसरात हृदयाला पिळवटून टाकणारी घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ नगर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय सुरज उर्फ गोट्या गणवीर या तरुणाने आपल्या 25 वर्षीय पत्नी अश्विनी गणवीर आणि तिची तीन वर्षांची मुलगी आरोही गणवीर हिचा गळा दाबून खून केला. नेहमीच्या कलहाला कंटाळून त्याने त्या दोघींची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आपण स्वतः पत्नी आणि मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोला शहरातील सिद्धार्थनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सुरजने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर त्याने अश्विनीसोबत दुसरं लग्न केलं. दोन ते तीन महिन्यातच सुरजच्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली. पुनर्विवाह केलेल्या अश्विनी आणि तिच्या मुलीसह सुरजने गळा आवळून दोघींची काल शनिवारी दुपारी हत्या केली. सुरजचं कौर्य इतक्यावरच थांबलं नाही तर तो पहिल्या पत्नीच्या मुलीलाही मारायला गेला. मात्र त्या ठिकाणी पहिल्या पत्नीचे आई-वडील यांनी सुरजला अडवल्यामुळे तो दुसऱ्या मुलीला मारू शकला नाही. दरम्यान एवढी मोठी निर्दयता सुरजमध्ये का आली? हा प्रश्न सुद्धा आता समोर आला आहे.
सुरज हा केटरिंगचं काम करीत होता. पहिल्या लग्नानंतर तीन वर्षातच त्याने घटस्फोट घेतला. यानंतर फेब्रुवारी महिन्यात अश्विनी सोबत पुनर्विवाह केला. अश्विनीचंही आधीच लग्न झालं होतं, तिला आरोही नावाची एक मुलगीही होती. सुरुवातीचे काही दिवस सुखात केले. मात्र लग्नाला दोन महिने होत नाही तोच त्याच्या पहिल्या पत्नीची मुलं त्याच्या घरी येऊ लागली. त्यामुळे अश्विनी आणि सुरजमध्ये वाद होऊ लागले. सुरजच्या पहिल्या पत्नीची मुलं वारंवार घरी येणं अश्विनीला फारसं आवडत नव्हतं. म्हणून तिचं आणि सुरजमधील वाद वाढले होते, परिणामी दोघांमध्ये दुरावा आला होता. काही दिवसापूर्वी त्याने अश्विनीला बेदम मारहाण केली. यानंतर अश्विनी माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर परत घरी आली.
नक्की वाचा - Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?
दोघांच्या मृतदेहाला जेवणाचा घासही भरवला
दरम्यान घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी सुरज घरी जेवणासाठी आला. तो जेवण करत असताना अश्विनीने शाब्दिक वादाला सुरुवात केली. वाद इतका वाढला की दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. यातच सुरजने आधी अश्विनीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याच पद्धतीने तीन वर्षीय सावत्र मुलीचाही गळा दाबून जीव घेतला. दोघांच्या मृतदेहाला जेवणाचा घासही भरवला. सूत्रांच्या माहितीनुसार, अश्विनीचं एक लाखांचं कर्ज सुरजने फेडलं होतं. परंतु दररोजच्या पहिल्या पत्नीच्या मुलीमुळे होत असलेल्या भांडणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
पहिल्या पत्नीच्या मुलीला मारण्यासाठी धावला...
सुरज एवढ्यावरच थांबवा नाही. पहिल्या पत्नीच्या मुलीला मारण्यासाठी तिच्या घरी गेला. पहिल्या पत्नीचे आई-वडील मधे आल्यामुळे मुलीचा प्राण वाचला. पोलिसांनी सुरजला ताब्यात घेतले आणि रामदास पेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी सुरजला चोप देण्यासाठी अश्विनीच्या नातेवाईक जमा झाले होते. दरम्यान पोलीस दलाला बोलावण्यात आलं. क्षणभराचा घरगुती वाद हा विकोपाला जाऊन अकोल्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. तर पत्नी अश्विनी आणि सावत्र मुलगी आरोही या दोघींच्या हत्येमुळे सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.