जाहिरात

Akola News: मामाच्या घरून निघाला तो परतलाच नाही! अकोला जंगलातील 'त्या' कुजलेल्या मृतदेहाचं धक्कादायक वास्तव

Akola News: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा जंगलात आढळलेल्या एका कुजलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांत यश आले आहे

Akola News: मामाच्या घरून निघाला तो परतलाच नाही! अकोला जंगलातील 'त्या' कुजलेल्या मृतदेहाचं धक्कादायक वास्तव
Akola News: सचिन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मामाच्या गावी राहत होता.

Akola News: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा जंगलात आढळलेल्या एका कुजलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांत यश आले आहे. उन्हामुळे छिन्नविछिन्न झालेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, मात्र तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला. मित्रांनीच दारूच्या नशेत झालेल्या वादातून आपल्याच मित्राचा काटा काढल्याचे धक्कादायक वास्तव या तपासातून समोर आले असून, पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दुर्गम जंगलात आढळला कुजलेला मृतदेह

रिधोरा शेतशिवारातील एका दुर्गम जंगल भागात 26 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह उन्हामुळे पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, हा अपघात नसून घातपात असावा असा संशय पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना आला. त्यांनी तातडीने दोन स्वतंत्र पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली.

( नक्की वाचा : Akola News: खुनाचा असा 'बनाव' जो कुणालाही पटेल, पण एका चुकीने वहिनी आणि पुतण्या अडकले जाळ्यात! )

अशी पटली मृताची ओळख

तपासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणे. पोलिसांनी मृतदेहावरील कपडे आणि इतर खुणांवरून आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली. या तपासातून मृताची ओळख सचिन वाल्मीक खंडारे (वय 29 वर्ष, रा. अमानतपूर ताकोडा, ता. बाळापूर) अशी पटली. सचिन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मामाच्या गावी राहत होता आणि दोन दिवसांपूर्वी कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता. तो परत न आल्याने कुटुंबीय काळजीत होते, मात्र जंगलात आढळलेला मृतदेह त्याचाच असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

तपासाचा टर्निंग पॉईंट काय?

सचिनची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रपरिवाराची आणि तो शेवटचा कोणासोबत दिसला होता याची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सचिन हा त्याचे मित्र आदेश सुधीर डोंगरे (वय 24) आणि अभिषेक प्रकाश गवळी (वय 24) यांच्यासोबत मोटारसायकलवर जाताना दिसून आला. या तांत्रिक पुराव्यामुळे तपासाची दिशा स्पष्ट झाली आणि पोलिसांनी या दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या.

पोलिसांनी अभिषेक गवळी याला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून, तर आदेश डोंगरे याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. सचिनसोबत दारू पिताना काही कारणावरून त्यांचा वाद झाला आणि त्या नशेतच त्यांनी सचिनची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कामगिरीचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com