योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात एका संशयास्पद मृत्यूच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला नैसर्गिक वाटणारा हा मृत्यू प्रत्यक्षात एक थंड डोक्याने केलेला खून असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी मृत्यूची बातमी दिली, त्यांनीच घरगुती वादातून गळा आवळून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. माना पोलिसांनी अत्यंत चातुर्याने आणि वेगाने तपास करत अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला असून, नात्याला काळिमा फासणाऱ्या वहिनी आणि पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात 26 मार्च 2026 रोजी झाली. सकाळी 09.40 वाजता फिर्यादी गोपाल भटकर यांना त्यांचा पुतण्या स्वप्नील भटकर याने फोन करून 'संजय काका मरण पावले आहेत' अशी माहिती दिली. माहिती मिळताच गोपाल भटकर तातडीने वाई गावात पोहोचले, तेव्हा त्यांना 50 वर्षीय संजय रामकृष्ण भटकर यांचा मृतदेह घरामागील गोठ्यात आढळून आला.
हा मृत्यू नैसर्गिक वाटत असला, तरी काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने मर्ग दाखल करून तपास सुरू केला.
( नक्की वाचा : Akola News: मामाच्या गावी गेलेल्या सचिनचा शेतात सापडला विद्रूप मृतदेह; अंगावरील खुणांमुळे संशयाचे काहूर)
मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय, मूर्तिजापूर येथे पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाने पोलिसांच्या संशयावर शिक्कामोर्तब केले.
संजय भटकर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झाला असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला वेग दिला.
घरगुती वादातून संपवलं आयुष्य
ठाणेदार गणेश नावकार यांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असता, घरातील सदस्यांवरच संशयाची सुई वळली. 26 मार्च रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरात मोठा वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या वहिनी संगीता विनोद भटकर (वय 48) आणि पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय 25) यांनी संजय भटकर यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारले. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला होता.
पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली
पोलिसांनी संशयाच्या आधारे वहिनी संगीता आणि पुतण्या स्वप्नील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
किरकोळ घरगुती वादातून त्यांनी स्वतःच्याच घरातील व्यक्तीचा जीव घेतल्याचे मान्य केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पूर्ण केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world