
योगेश शिरसाट, अकोला: लग्न म्हणजे आनंदाचा सोहळा.. पण अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे गावात लग्नाच्या वरातीदरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे दुःखाचे सावट पसरले. वरातीत वाजणाऱ्या डीजेच्या वादावरून दोन गट भिडले आणि थेट रस्त्यावरच दगडफेक आणि हाणामारी सुरू झाली. ही धक्कादायक घटना गावातील वातावरण चिघळवणारी ठरली असून या वादाला राजकीय वळण लागल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्याा माहितीनुसार, अकोल्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा गावात लग्नाच्या वरातीत दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. लग्नाची वरात एका घरासमोरून जात असताना "डीजेच्या स्पीकरमुळे विद्युत वाहिनीला धोका निर्माण होतो या कारणावरून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांतच ही चर्चा अंगावर घेत धक्कादायक हाणामारीत परिवर्तित झाली.. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या गोंधळात काहींनी थेट वरातीवरच दगडफेक केली आणि मग पळापळ झाली..
या राड्यात 4 ते 5 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले... मात्र, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.या घटनेनंतर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रारी नोंदविण्यात आल्या.
(नक्की वाचा- Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)
विशेष म्हणजे, या वादाला राजकीय वळण मिळाले असून, भाजप व शिवसेना (उबाठा गट) यांचे समर्थक आमने-सामने ठाकले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर केवळ गुन्हा तपासण्याचे नाही, तर गावातील तणाव निवळवण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांकडून माहिती घेत तपास सुरू केला आहे. मात्र, लग्नाच्या शुभ प्रसंगी झालेली ही हिंसक घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. यावर ठाणेदार यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world