Akola News: अकोल्यात सायबर ठगांची भयंकर नवी शक्कल! QR कोडवर पाठवला 1 रुपया आणि 60 हजार घेऊन पसार

Akola News: सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांना लुटण्यासाठी रोज नवनव्या क्लृप्त्या शोधायला सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola News: आरोपींनी सुरुवातीला QR कोडचा वापर करून फक्त 1 रुपया पाठवला.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांना लुटण्यासाठी रोज नवनव्या क्लृप्त्या शोधायला सुरुवात केली आहे. असाच एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारा प्रकार अकोल्यात उघड झाला आहे. अकोल्यातील एका डिजिटल केंद्र चालकाला विश्वासात घेऊन हजारो रुपयांचा चुना लावण्यात आला. या नव्या सायबर फसवणुकीमुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या आणि केंद्र चालवणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. संबंधित केंद्र चालकाने या फसवणुकीप्रकरणी तातडीने पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण?

अकोल्याच्या शिवनगर भागातील सुरेंद्र किशोर चोखट यांच्याबरोबर हा सर्व प्रकार घडला. ते बाळापूर रोड, जुने शहर परिसरात रुद्रा मनी ट्रान्सफर अँड झेरॉक्स अँड कोल्ड ड्रिंक या नावाने आपले ग्राहक सेवा केंद्र चालवतात. 

Advertisement

9 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास दोन तरुण त्यांच्या केंद्रावर पैसे काढण्याच्या बहाण्याने आले. त्यातील एकाने आपले नाव ऋषिकेश गजानन इंगळे असे सांगितले. सुरुवातीला केंद्र चालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी QR कोडचा वापर करून फक्त 1 रुपया पाठवला. विश्वास बसल्यानंतर त्यांनी सुरुवातीला 6000 रुपये ट्रान्सफर करतो असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात त्यानंतर डिजिटल माध्यमातून 59 हजार 999 रुपये पाठवल्याचे दाखवून केंद्र चालकाकडून एकूण 60 हजार रुपये रोख स्वरूपात हातात घेतले.

( नक्की वाचा : Palghar News : MPSC एकत्र पास झाले, पण एका कारणामुळे बिघडले संबंध, पालघरमध्ये तरुणाचे तरुणीवर सपासप वार )

संशय आला म्हणून....

पैसे रोख स्वरूपात देताना केंद्र चालक सुरेंद्र चोखट यांना थोडा संशय आला होता. त्यामुळे सावधगिरी म्हणून त्यांनी पैसे नेणाऱ्या संबंधित युवकाचे ओळखपत्र घेतले, त्याची झेरॉक्स काढून त्यावर त्याची स्वाक्षरीदेखील घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा झाल्याचे दिसले, त्यामुळे सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत होते. 

मात्र खरा धक्का त्यांना 11 जून रोजी बसला, जेव्हा बँकेकडून त्यांना एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये या व्यवहारातील रक्कम होल्ड म्हणजेच गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. चोखट यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, ज्या खात्यातून त्यांच्याकडे पैसे आले होते, त्या मूळ खातेदाराने सायबर पोलिसात तक्रार नोंदवल्यामुळे ही कारवाई झाल्याचे समोर आले. म्हणजेच सायबर ठगांनी चोरीचे किंवा फसवणुकीचे पैसे केंद्र चालकाच्या खात्यावर पाठवून त्यांच्याकडून पांढरे कडक नोटा रोख स्वरूपात लांबवल्या होत्या.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेंद्र चोखट यांनी तात्काळ त्या युवकाशी संपर्क साधला. त्यावर त्याने ते पैसे स्वतःचे नसून मित्राचे असल्याचे सांगत हात झटकले. जेव्हा त्या मित्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो होऊ शकला नाही. पुढील चौकशीतही संबंधित तरुणांकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सुरेंद्र चोखट यांनी सायबर सेल आणि जुने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Advertisement

सीसीटीव्ही आणि कागदपत्रांच्या आधारे शोध सुरू

फसवणूक करणाऱ्या संशयितांचे ओळखपत्र, त्यांची स्वाक्षरी आणि केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांकडे उपलब्ध आहे. या भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच दोन संशयितांनी काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने आणखी एका ग्राहक सेवा केंद्र चालकालाही लुटल्याची माहिती समोर आली आहे. 

सायबर ठगांनी ग्राहक सेवा केंद्र चालकांना लक्ष्य करण्यासाठी ही नवी शक्कल लढवल्यामुळे नागरिकांमध्ये आणि केंद्र चालकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सेलने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article