जाहिरात

Akola News : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा राडा; नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

अकोला महानगरपालिकाच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला.

Akola News : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा राडा; नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Municipal Corporation News : अकोला महानगरपालिकाच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. विषय समित्या आणि स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर शहरातील चार झोनच्या रचनेचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला आणि त्यावरून वातावरण तापले. काही प्रभागांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. झोन रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला. अध्यक्षांनी वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र घोषणाबाजीमुळे काही काळ कामकाज ठप्प झाले.

शाब्दिक चकमक ते धक्काबुक्की..

झोन रचनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसचे नगरसेवक फिरोज खान यांनी आक्रमक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गटचे नगरसेवक रफिक सिद्दिकी आमने-सामने आले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि भारतीय जनता पार्टीच्या तसेच शहर सुधार आघाडीच्या सदस्यांमध्ये तीव्र वाद झाला. काही सदस्य सभागृहाच्या मध्यभागी येत एकमेकांच्या अंगावर गेले, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली.

नक्की वाचा - Akola News : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरणासाठी दबाव; महिलेच्या तक्रारीने अकोला हादरलं!

बहुमताने मंजुरी, पण वाद कायम..

अखेर झोन रचनेसंदर्भातील ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली आणि बहुमताने झोनची निर्मिती मंजूर करण्यात आली. मात्र मतदानानंतरही वातावरण शांत झाले नाही. पुन्हा एकदा घोषणाबाजी आणि गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले. महापालिकेच्या पहिल्याच सभेत झालेल्या या प्रकारामुळे आगामी काळातही राजकीय संघर्ष तीव्र राहण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांमध्येही या घडामोडींवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com