Akola News : भीम जयंतीची मिरवणूक ठरलं कारण? अकोटमध्ये नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : अकोल्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या दरम्यान, अकोट नगर परिषदेमधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका मुमताज खानम इमरान खान या वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आल्या. याचाच राग मनात धरून वंचितच्या नगरसेविका पतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज दुपारच्या सुमारास नगरसेविकेचे पती घराबाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या गटाने अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर झडप घालत लाठी-काठ्यांनी पाईप व इतर वस्तूने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धमक्या आणि भीम जयंतीचा संदर्भ..

अकोटमध्ये पराभूत झालेल्या विरोधी गटाचा निवडणुकीचा जुना वाद पुन्हा एकदा सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाकडून नगरसेविकेच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भीम जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होऊन नाचल्याच्या कारणावरूनही मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक पातळीवर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

नक्की वाचा - Yavatmal News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावी आला; मिरवणुकीत 16 वर्षांचा हरी रक्ताच्या थारोळ्यात...

उपचार सुरू; पोलिसांची कारवाई..

दरम्यान अकोट नगरपरिषदमध्ये राजकीय वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नगरसेविकेच्या पतीला तातडीने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.