- अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह प्रशासनाने वेळेवर रोखला
- विवाहासाठी मंडप सजलेला होता आणि जवळपास पाचशेहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते, मात्र विवाह थांबवण्यात आला
- मुलीच्या आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव असल्याने पालकांनी बालविवाहाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे
योगेश शिरसाट
जिल्ह्यात दिवसेंदिवस बालविवाहाच्या घटना समोर येत असून प्रशासनासाठी ही गंभीर चिंतेची बाब ठरत आहे. अशातच अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाने ऐनवेळी रोखून मोठी कारवाई केली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अकोला, बालविकास प्रकल्प कार्यालय (नागरी), जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ‘ॲक्सेस टू जस्टिस' आयएसडब्ल्यूएस अकोला आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. विशेष म्हणजे वधू ही अकोल्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी असून 23 वर्षीय वर धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे एका मुलीचे बालपण व शिक्षण वाचवण्यात यश आल्याची भावना व्यक्त होत आहे.
मंडप सजला, पण विवाह थांबला..
गोपनीय माहितीच्या आधारे बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले आणि ‘ॲक्सेस टू जस्टिस'चे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी अकोट फैल पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक आर. जी. शेख यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर वयाचे पुरावे गोळा करून संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विवाहासाठी मंडप सजलेला होता. जवळपास 500 हून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. “शुभमंगलम सावधान” होण्यापूर्वीच पथकाने मुलीच्या पालकांची भेट घेतली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीच्या आईने सांगितले. त्यानंतर वर-वधू पक्षाला पोलीस स्टेशनमध्ये आणून बालविवाह न करण्याबाबत कडक ताकीद देण्यात आली.
बालविवाह हा दंडनीय गुन्हा
बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांनी दोन्ही पक्षांची बैठक घेऊन कठोर इशारा दिला. तसेच दोन्ही बाजूंच्या पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, विधा उंबरकर तसेच पोलीस निरीक्षक आर. जी. शेख, एएसआय विनोद चौरपगार आणि हेडकॉन्स्टेबल संतोष चिंचोळकर यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
प्रशासनाचे आवाहन
मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असताना विवाह करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098, आपत्कालीन सेवा 112 किंवा बचपन बचाव आंदोलन 18001027222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही एक सामाजिक जबाबदारी असल्याचं ही प्रशासनाने सांगितलं. त्यासाठी सर्वांना जागृत रहावे असं ही आवाहन करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world