योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News : अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी मध्यरात्री एका किरकोळ वादातून थरारक हत्याकांड घडल्याची घटना घडली. चहाच्या टपरीवर सुरू झालेल्या शाब्दिक वादाने काही वेळातच गंभीर स्वरूप धारण केलं. “तू माझ्याकडे काय पाहतोस?” या कारणावरून झालेल्या वादात 3 तरुणांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने त्या मुलावर वार केले,अशी माहिती आहे. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची जलद कारवाई, 6 तासांत आरोपी जेरबंद..
घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.पोलिसांनी विविध तांत्रिक माहिती,स्थानिक माहितीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला.अखेर अवघ्या सहा तासांच्या आत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले.आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना अकोल्यात आणण्यात आले.अल्पावधीत आरोपींना अटक केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.या प्रकरणामुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवरही नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्की वाचा >> Inside Story: 15 भाषांचं ज्ञान, 200 कोटींचं साम्राज्य अन् महिलांचं लैंगिक शोषण, वाचा अशोक खरातची A To Z कुंडली
दरम्यान,पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला.या वेळी संपूर्ण घटनेची पुनर्रचना करण्यात आली.आरोपींमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी वाद झाला आणि हल्ला कसा केला? याबाबत तपास अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली.या कारवाईमुळे तपास अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात 'या' ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट
तसेच परिसरातील नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी आणि आरोपींमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली.या संदर्भात प्रभारी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांनीही पोलिसांकडून वेगाने तपास सुरु असल्याची माहिती दिली.