योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News Today : अकोला शहरात मादक पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोल्याच्या रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी बाहेर जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. आज 27 मार्च रोजी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती. अकोला रेल्वे स्टेशन परिसरात तीन इसम दोन बॅगमध्ये मादक पदार्थ गांजा घेऊन येणार आहेत, अशी खबर पोलिसांना लागली होती. ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवून सापळा रचला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व डीबी पथकाने चिफ हेल्थ इन्स्पेक्टर इमारतीसमोरील रोड, रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावला. संशयित हालचाली दिसताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली.
11 किलोपेक्षा जास्त गांजा व मोबाईल जप्त
रामदास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची सखोल तपासणी केली असता त्यांच्या जवळील दोन बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. आरोपींकडून एकूण 11.835 किलो ग्रॅम मादक पदार्थ गांजा तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 21 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गौरव विजय इंगळे (21), राहुल बाळासाहेब देशमुख (22) आणि देवानंद गजानन शेळके (23) यांचा समावेश आहे.
नक्की वाचा >> Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ, 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू, प्रकरण काय?
हे तिन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 300/2026 नोंदवून एनडीपीएस कायद्यातील कलम 8 (क) व 20 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नक्की वाचा >> Pune News : 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित, सावित्रीबाई फुले विद्यापीठात काय घडलंय? विद्यार्थी रस्त्यावर
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली धडक कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी.पी. रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, पोलीस हवालदार दादाराव टापरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्याम मोहळे, अनिल धनभर, अभिजित इंगळे, प्रेम नांदोकार, अंकित कमलाकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी लाहोळे आणि कावेरी ढाकणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच एएनटीएफ अमरावती बॅचचे विजय उर्फ सोनू सिंग ठाकुर यांनीही या मोहिमेत सहकार्य केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात मादक पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठा आळा बसणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world