योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : सदरक्षणाय खलनिग्रहणाय... सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. महाराष्ट्र पोलिसांचे हे ब्रीदवाक्य प्रत्येक पोलीस ठाण्याच्या भिंतीवर अभिमानाने कोरलेले असते. मात्र, अकोला पोलीस दलात घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने या ब्रीदवाक्यालाच काळिमा फासला आहे. ज्या खाकीवर रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्याच खाकीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून खाकी वर्दी पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
खाकी वर्दीतील वासनांध चेहरा
अकोला मधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव असे या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. एका 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते.
तिथे कर्तव्यावर असलेल्या राजेश जाधव याने मर्यादेचे उल्लंघन करत संबंधित महिलेला तू स्मार्ट दिसतेस, अशी टिप्पणी केली. इतकेच नाही तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला 10,000 रुपये देतो, अशी निर्लज्ज मागणी केली. एका पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे कोठडीत असलेल्या महिलेशी वर्तन केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat: भोंदू कॅप्टनच्या पापात पत्नीही भागीदार? पाडळीच्या 'सुनीता'चा 'कल्पना'होण्याचा धक्कादायक प्रवास )
महिला कर्मचाऱ्याची सतर्कता
संबंधित महिलेने घाबरून न जाता हा सर्व प्रकार तिथे असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला. त्या महिला कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. हे ऐकताच वरिष्ठ अधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी तात्काळ राजेश जाधव याला जाब विचारला आणि त्याची चांगलीच झाडाझडती घेतली.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राजेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. सुदर्शन पाटील (SDPO, अकोला) यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
( नक्की वाचा : Akola News: अकोला महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; इतिहासात पहिल्यांदाच 16 नगरसेवक एकाच वेळी निलंबित )
नेमके प्रकरण काय ?
ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला, तिला अकोला सायबर पोलिसांनी एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. रुबीना फारूक शेख आणि अतिष दिलीप गुप्ता या दोन आरोपींनी फिर्यादी हिरासिंग ठाकूर यांना पार्टटाईम जॉब आणि हायप्रोफाईल महिलांशी ओळखीचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख 5,830 रुपयांना गंडवले होते.
पालघर येथून या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच कोठडीत असताना हा धक्कादायक प्रकार घडला.
बडतर्फीची मागणी आणि महिला आयोगाचा संताप
या घटनेनंतर सामाजिक क्षेत्रातून तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. संबंधित अधिकाऱ्याचे केवळ निलंबन पुरेसे नाही, तर त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 116 महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत जर रक्षकच भक्षक बनणार असतील, तर सर्वसामान्य महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world