योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला महानगरपालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये झालेल्या तीव्र राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शहरातील वेगवेगळ्या विकासकामांवर चर्चा सुरू असताना अचानक उद्भवलेल्या वादामुळे सभागृहाचं रूपांतर रणांगणात झालं. या गोंधळात महापौरांनी कठोर पाऊल उचलत विरोधी पक्षाच्या 16 नगरसेवकांना निलंबित केलं आहे. महापालिकेच्या इतिहासत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने सदस्यांवर कारवाई झाल्याने अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला महानगरपालिकेची आमसभा सुरू असताना प्रशासकीय विषयांवर चर्चा सुरू होती. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे स्वीकृत सदस्य सुनील इनानी आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले. त्याचवेळी सभागृहातील एका सदस्याने '50 खोके एकदम ओके' अशी घोषणा दिली आणि तिथूनच वादाला तोंड फुटलं.

या घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले, ज्यामुळे सभेचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले. महापौर शारदा खेडकर यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, परंतु घोषणाबाजी थांबण्याचे नाव घेत नव्हती.
( नक्की वाचा : Akola News: 138 वर्षांची परंपरा बदलली! अकोल्यातील सिदाजी महाराज यात्रेत भाविकांनी काय केलं? )
इतिहासातील पहिलीच घटना
सभागृहातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महापौर शारदा खेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करत एकूण 16 नगरसेवकांना पुढील 3 सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 5, शिवसेना ठाकरे गटाचे 3 आणि काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले आणि महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पोलिसांच्या मदतीने विरोधकांना सभागृहाबाहेर काढले
निलंबनाचा निर्णय होऊनही विरोधी सदस्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिला आणि आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सभागृहात प्रवेश करून निलंबित सदस्यांना बाहेर काढले, त्यानंतरच सभेचे कामकाज पुन्हा सुरू होऊ शकले.
या कारवाईमुळे महापालिका परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हा संघर्ष आता रस्त्यावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
हुकूमशाहीचा आरोप
या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपा प्रणित शहर सुधार आघाडीवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी पक्ष मनमानी कारभार करत असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ही 'हुकूमशाही' पद्धतीची कारवाई केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने केला आहे. हा लोकशाहीवरील आघात असल्याची भावना विरोधी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि कामकाज सुरळीत चालवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world