योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : अकोला रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. गांधीधाम स्पेशल एक्सप्रेसमध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 16 किलो 417 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
अकोला रेल्वे पोलिसांना 19 डिसेंबर 2025 रोजी एका गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली होती. ट्रेन क्रमांक 20803 गांधीधाम स्पेशल एक्सप्रेसच्या ए/1 कोचमधून गांजाची तस्करी केली जात असल्याचे समजताच रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर या ट्रेनची प्रतीक्षा करत कडक बंदोबस्त तैनात केला.
संशयास्पद बॅगांची झडती आणि आरोपींची धरपकड
दुपारी 12 च्या सुमारास ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच पोलिसांनी ए/1 कोचमध्ये प्रवेश केला. यावेळी बर्थ क्रमांक 1 वर सत्यम प्रफुल पात्रा (वय 26) आणि बर्थ क्रमांक 2 वर पूजा चितरंजन जेना (वय 23) हे दोघे संशयास्पदरीत्या बसलेले आढळले. त्यांच्याकडे असलेल्या मोरपंखी रंगाच्या सॅकबॅग आणि इतर दोन बॅगांची पोलिसांनी विचारपूस केली.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील बहुचर्चित दंगल प्रकरणात 14 वर्षांनी 59 जणांना मिळाला न्याय; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय )
मात्र, त्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पंचांच्या समक्ष बॅगांची झडती घेतली असता, खाकी सेलोटेपने गुंडाळलेले 8 बंडल सापडले.
लाखो रुपयांचा गांजा जप्त
पोलिसांनी जप्त केलेले बंडल उघडले असता त्यातून गांजाचा उग्र वास येत होता. या गांजाचे वजन केले असता तो 16 किलो 417 ग्रॅम इतका भरला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी हा गांजा कुठून आणला आणि तो पुढे कोणाला पुरवण्यात येणार होता, याचा आता तपास केला जात आहे.
( नक्की वाचा : Amravati News :अमरावतीत बापा देखत पोटचा गोळा वाहून गेला; कॅनलमध्ये पाय धुताना भयंकर घटना )
या प्रकरणी अकोला लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने यशस्वी केली. या कारवाईमुळे रेल्वेमार्गे होणाऱ्या तस्करीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.