शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati Tragedy: अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वत:च्या डोळ्यादेखत तरुण मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ एका बापावर आली. तिवसा परिसरात असलेल्या कॅनलमध्ये पाय धुण्यासाठी गेलेला 21 वर्षांचा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला. ही घटना घडली तेव्हा त्याचे वडील तिथेच उपस्थित होते, मात्र काळाने घाला घातल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कॅनलच्या काठावर घडला थरार
अमरावती जिल्ह्यातील तिवसा ते आनंदवाडी मार्गावर एक मोठा कॅनल आहे. याच मार्गावरून जात असताना ओम अरविंद सहारे हा 21 वर्षांचा तरुण पाय धुण्यासाठी कॅनलच्या काठावर उतरला होता. गुरुवारी (18 डिसेंबर 2025) दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ओम पाय धुवत असताना अचानक त्याचा पाय घसरला किंवा पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने तो सावरू शकला नाही आणि थेट कॅनलमध्ये पडला. विशेष म्हणजे ओमचे वडील त्याच्यासोबतच होते, मात्र पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की ओम त्यांच्या डोळ्यादेखत लांब वाहून गेला.
( नक्की वाचा : Yavatmal News : दीड हजार लोकवस्तीच्या गावात 27 हजार जन्म; यवतमाळमधील 'त्या' ग्रामपंचायतीत नक्की घडतंय काय? )
प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तिथे गर्दी केली आणि तातडीने प्रशासनाला कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या कॅनलच्या परिसरामध्ये बोटीच्या साहाय्याने ओमचा शोध घेतला जात आहे. बराच वेळ शोध घेऊनही अद्याप ओमचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत, तरीही प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती वानखडे, भाजप नेत्या छायाताई दंडाळे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ओमच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असून प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेची माहिती घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world