योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोला शहरात शनिवारी (6 सप्टेंबर) एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघटना या घटनेचा तीव्र निषेध करत असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय मुलीवर घरात एकटी असताना, 28 वर्षीय तौहिद समीर याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. ही धक्कादायक घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी दुपारी 4:30 वाजता घडली. या घटनेनंतर आरोपी तौहिद समीर फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : Akola News : '' जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल...", ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; अकोल्यात खळबळ )
ठाकरे सेनेचा संतप्त इशारा
या प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (ठाकरे गट) अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी पीडित मुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तिच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
मंगळवारी जाहीर केलेल्या एका विधानात राजेश मिश्रा यांनी म्हटले की, "जो कोणी या नराधम आरोपीचा एक हात, एक पाय आणि लिंग कापेल, त्याला शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल." या वादग्रस्त विधानामुळे शहरात आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बुलडोजरची मागणी
आज, (बुधवार 10 सप्टेंबर ) ठाकरे सेनेचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी अकोला महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना निवेदन दिले. त्यांनी आरोपीचे घर उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांवर होणाऱ्या कारवाईच्या धर्तीवर बुलडोजरने पाडण्याची मागणी केली. अशा अमानवी कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरोपी अद्याप फरार
घटनेला 4 दिवस उलटल्यानंतरही आरोपी तौहिद समीर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 स्वतंत्र पथके तयार केली असून, स्थानिक गुन्हे शाखा पथकही यात सहभागी झाले आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी, सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोला शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा राजराजेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात येणार असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवण्याची मागणी केली आहे.