
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी तौहिद समीर बैद (वय 28) याचा शोध पोलीस घेत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जो कोणी आरोपीचा एक हात, एक पाय आणि लिंग कापेल, त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी (6 सप्टेंबर) रोजी दुपारी 4.30 वाजता गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घरात कुणी नसताना आरोपी तौहिद बैद याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी घटनेच्या तीन दिवसांपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला )
शिवसेना शहरप्रमुखांचा गंभीर इशारा
या अमानवी घटनेनंतर संपूर्ण अकोला शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वजण आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना राजेश मिश्रा यांनी एक खळबळजनक घोषणा केली. "जो कोणी या नराधम आरोपीचा एक हात, एक पाय आणि लिंग कापेल, त्याला शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल," असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शहरात आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण कायद्याच्या चौकटीबाहेरील हे विधान असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
पोलिसांची शोधमोहीम सुरू
दरम्यान, बजरंग दल, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिद खान पठाण यांच्यासह अनेक सामाजिक संघटना या प्रकरणी आक्रमक झाल्या आहेत. तर, पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, ठाकरे गटाने दिलेल्या या वादग्रस्त इशारामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world