
अंबरनाथ: अंबरनाथ पोलिसांनी एका चोरट्याला गुजरातमधून अटक केली आहे, ज्याने एका व्यावसायिकाला खरे सोने (Real Gold) दाखवून नकली सोने (Fake Gold) देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केली होती. या पैशातून त्याने आपल्या मुलासाठी एक महागडी केटीएम (KTM) बाईक खरेदी केली होती. धर्मा कच्छी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या मुलाचा शोध पोलिस घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील व्यावसायिक सूरज शामनानी यांची फसवणूक झाली होती. एका व्यक्तीने त्यांना सोन्याचे दागिने दाखवले आणि हे दागिने खरे असल्याचे सांगितले. या दागिन्यांसाठी त्याने सूरज यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर, त्याने सूरज यांच्या हातात नकली दागिने दिले आणि तो पैसे घेऊन फरार झाला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एसीपी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अविनाश गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
Indore News : 24 किन्नरांनी एकत्र येत प्यायलं विष, अनेक जण गंभीर; परिसरात खळबळ
पोलिसांनी आरोपीला गुजरातमध्ये पकडले
तपास सुरू असताना, पोलिसांना सूरज यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा फोटो मिळाला. त्यावरून त्याची ओळख धर्मा कच्छी अशी पटली. धर्मा कच्छीच्या विरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. धर्माला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना झाले आणि त्यांनी त्याला गुजरात राज्यातील सर्वोदय नगर डुंगरी मोडासा येथून अटक केली. पोलिसांनी धर्माकडून सूरज यांच्याकडून घेतलेल्या पैशातून जवळपास साडेसात लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित पैशातून धर्माने त्याच्या मुलासाठी एक महागडी KTM बाईक खरेदी केली होती. त्यामुळे पोलिस आता त्याचा मुलगा अजय याचा शोध घेत आहेत. धर्मा आणि त्याचे मित्र, कुटुंबीय असे सगळेजण अशा प्रकारची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी धर्माने आणखी काही लोकांना फसवले आहे का, याचा तपास सुरू केला आहे.
(नक्की वाचा: Pune News: पुरंदर एअरपोर्ट वादात आता शरद पवारांची उडी, केलं मोठं वक्तव्य)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world