
हॉटेलच्या चिमणीवरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने गुंड बोलावले. ऐवढेच नाही तर त्या गुंडांच्या माध्यमातून हॉटेल चालकाला बेदम मारहाण ही करण्यात आली. ही घटना अंबरनाथच्या भास्कर नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून काही जण फरार आहेत. छोट्या कारणामुळे झालेल्या या राड्याची चर्चा अंबरनाथमध्ये रंगली आहे. गेल्या काही दिवसात अंबरनाथ परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथच्या भास्कर नगर परिसरात आर.एम टेलर्स समोर चंद्रकांत गांगुर्डे आणि त्यांचा भाऊ उमेश गांगुर्डे यांचं चायनीजचं हॉटेल आहे. या हॉटेलची चिमणी त्यांनी शेजारच्या गल्लीतूनवर काढली होती. यावरून शेजारी राहणारे राकेश गुप्ता यांच्याशी त्यांचे वारंवार वाद सुरू होते. यातूनच राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ, तसेच संतोष लष्कर, आकाश जगले आणि प्रकाश म्हात्रे यांनी उमेश आणि चंद्रकांत गांगुर्डे या दोघांना मारहाण केली.
ट्रेंडिंग बातमी - Corona News: कोरोना परत आला आहे का? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
ही मारहाण जबर होती. त्यांना लोखंडाच्या स्टिकने मारहाण करण्यात आली. यात उमेश गांगुर्डे याचं बोट फ्रॅक्चर झालं आहे. त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत राकेश गुप्ता आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी उमेश गांगुर्डे यांनी केली आहे.
अंबरनाथ परिसरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनात वाढ झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिकामध्ये मात्र भितीची वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण डोंबिवलीनंतर अंबरनाथ बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक राहाण्यासाठी जात आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे ते स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. अशा वेळी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घातला पाहीजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world