शुभम बायस्कार, प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातल्या येवदा (ता. दर्यापूर) येथील फूस लावून पळून नेलेल्या 21 वर्षांच्या विवाहितेच्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या प्रकरणात हिंदू संघटनांनी आक्रमक होत संबंधित आरोपीविरुद्ध 'लव्ह जिहाद'चा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला शोधून काढत नातेवाईकांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणातल्या पीडितेने दोन आरोपीं विरुद्ध बलात्कार, अत्याचार आणि ॲट्रॉसिटीची तक्रार येवदा पोलिसात दाखल केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
शेख असीम शेख कलीम (28, येवदा), व मोबिन पठाण (25, खोलापूर) अशी या प्रकरणातल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांमध्ये तक्रार दाखल होताच आरोपींनी गावातून पळ काढलाय. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथील 21 वर्षीय विवाहिता तिच्या चिमुकल्या मुलीसह भावाच्या एका कार्यक्रमासाठी 4 मे रोजी येवद गावात माहेरी आली होती. त्यावेळी दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने पतीने तिच्याकडे दिली होती. पीड़िता गावात आल्याची खबर लागताच तिचा जुना मित्र आरोपी शेख असिम शेख कलीम याने तिच्याशी जवळीक साधली. माझ्यासोबत चल, आपण लग्न करू दुसऱ्या गावात जाऊन संसार मांडू असे आमिष देत तिला फुस लावून पळून नेले.
( नक्की वाचा : अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला? )
या प्रकरणी 'लव्ह जिहाद'चा आरोप करत हिंदू संघटनांनी आक्रमक होत तरुणीला शोधून काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला शोधून काढत नातेवाईकांच्या स्वाधीन केले होते. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडित तरुणीनं येवदा पोलीस स्टेशन गाठत आरोपी शेख असीम शेख कलीम आणि मोबिन पठाण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, अपहरण व ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय? )
या तक्रारीनुसार आरोपींनी तिला संभाजीनगर, अमरावती, दर्यापूर येथे यासह वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 9 ते 13 मे पर्यंत ही अत्याचाराची मालिका सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी तिच्याकडे असलेली दीड लाखांची रोख रक्कम आणि तीन लाखांची दागिने देखील आरोपींनी हडपली आहेत. आपल्याविरुद्ध तक्रार देणार याची कुणकुण आरोपींना पूर्वीपासूनच होती. त्यामुळे तक्रार देण्यापूर्वीच त्यांनी गावातून पळ काढला आहे. पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.