ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : अवघ्या ३ हजारांचा लोभ इलेक्ट्रिक विभागातील एका कर्मचाऱ्याला चांगलाच महागात पडला आहे. हजारोंचा पगार असलेल्या या कर्मचाऱ्याने अवघ्या ३ हजार रुपयांनी लाच घेतल्याचं समोर आलं आहे. BEST च्या कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुनील कावळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी सुनील कावळे हा बीईएसटीच्या इलेक्ट्रिक विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदाराच्या कॅफेचे वीज मीटर बंद करण्याची आणि ते काढून घेण्याची धमकी दिली होती. हे टाळण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासर्व प्रकारानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पडताळणीत गुन्हा निष्पन्न
तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी सुनील कावळे याने तडजोडीअंती २,५०० रुपये लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाले. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास नकार दिला, परंतु लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनील कावळे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बृहन्मुंबई विभागाच्या एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, तपास अधिकारी म्हणून आशिष गिलडा हे पुढील काम पाहत आहेत. या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये कडक संदेश गेला आहे.