शुभम बायस्कार, अमरावती
वडील आणि मुलामध्ये टीव्ही बघण्यावरुन झालेल्या शुल्लक वादाचा शेवट भयानक झाला आहे. वडील आणि मुलामध्ये झालेला हा किरकोळ वाद इतका टोकाला गेला की वडिलांनी मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे.
अमरावतीच्या फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत येणाऱ्या लुंबिनी नगरात ही घटना घडली आहे. मंगळवारी 3 सप्टेंबरच्या दुपारी ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने घटनास्थळी भेट देत आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत.
(नक्की वाचा - Pune Crime : पुण्यात हॉटस्पॉट दिला नाही म्हणून हत्या; भररस्त्यात चेहरा छिन्नविछिन्न होईपर्यंत ठेचला!)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पांडुरंग काकडे (40) असे मृत मुलाचे नाव असून पांडुरंग रामकृष्ण काकडे (61) असे हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव आहे. राहुल व वडील पांडुरंग यांच्यामध्ये घरातील टीव्ही लावण्यावरुन वाद झाला. या वादानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. या खडाजंगीनंतर वडिलांनी राहुलची सतुर मारून हत्या केली.
(नक्की वाचा - 35 सेकंदात खेळ खल्लास, वनराज निवांत उभा होता अन्...; पुण्यातील गँगवॉरचा Live Video)
या संदर्भातील माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपी पांडुरंग काकडे याला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.