मनोज सातवी
पालघरच्या वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्या बरोबर पुढे जे काही केले त्याचा विचारही तुम्ही करणार नाही. पण त्या तरूणीने हिंम्मत दाखली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणी वाडा पोलीसांनी थेट नाशिकमध्ये कारवाई करत या विकृत तरूणाला अटक केली आहे. प्रेम राजेश सोनी असे त्याचे नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रेम राजेश सोनी. हा नाशिकच्या सिन्नर इथे राहाणारा. त्याने स्वत:चे फेक इंस्टाग्राम अकाऊट सुरू केले होते. त्यावरून त्याने वाड्यातील एका ग्रामीण भागात राहाणाऱ्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. साधा भोळा चेहरा आणि नाव "प्रेम", असे असले तरी या चेहऱ्यामागे एक विकृत आणि धोकेबाज आरोपी दडला होता. इंस्टावर या दोघांचीही मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सुरुवातीला तिचा विश्वास जिंकला. त्यामुळे ती देखील त्याच्या जाळ्यात फसत गेली. तिथेच तिची चुक झाली. जे नाही करायला पाहिजे तेच ती करून बसली.
प्रेम सोनी याने इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून त्यावर दुसऱ्याचा फोटो लावत सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओडले. सुरूवातीला तिच्याकडून तिचे सामान्य फोटो आणि विडीओ मागवले. त्यानंतर तिचे नग्न फोटो आणि विडीओची त्याने तिच्याकडे मागणी केली. ते फोटो आणि व्हिडीओ तिने प्रेम याला पाठवले. त्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. सतत होणाऱ्या त्रासाला ती कंटाळली. आपण फसलो आहोत याची जाणीव तिला झाली. त्यानंतर तिने थेट वाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर तिने तक्रार देत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दतात्रय किंद्रे यांनी तपास पथक तयार केली. त्यानंतर आरोपी प्रेम सोनी याला सिन्नर येथून अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत असून या आरोपीने आणखी काही मुलींची फसवणूक केली आहे का याबाबतचा तपास वाडा पोलीस करीत आहेत. तसेच सोशल मीडिया वापर करताना अशा प्रकारच्या अनोळखी व्यक्तीच्या भूलथापांना बडी न पडता काळजी घेण्याचे आवाहन वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दतात्रय किंद्रे यांनी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world