निलेश वाघ, प्रतिनिधी
मालेगावतील नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत बेराेजगार तरुणांच्या खात्यावरून 114 काेटी रुपयांची आर्थिक उलाढाल करून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत सुतोवाच केलंय. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी नवी माहिती येण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणाची व्याप्ती आता महाराष्ट्र आणि गुजरात पुरतीच राहिली नाही तर सुमारे २१ राज्यांत असे प्रकार समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रातीलच काेल्हापूरच्या बँकेतील वेगवेगळ्या खात्यातून तब्बल 1 काेटी 90 लाख तसेच नागपूर, मुंबई, पुणे येथील वेगवेगळ्या बँकांच्या शाखेतून 20 लाखांपासून दीड काेटींपर्यंत सुमारे 10 काेटींच्या रक्कमा मालेगावच्या तरुणांच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चाैकशीत समाेर आली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्था करीत असतानाच आता आयकर विभागाच्या विविध पथकांद्वारेही या पैश्यांबाबत स्वतंत्र्यपणे तपास करीत आहे.
मालेगावच्या नामकाे बँकेच्या शाखेत आणि महाराष्ट्र बँकेत 12 बेराेजगार तरुणांच्या खात्यात सुमारे 114 काेटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भाजपचे माजी खासदार किरीट साेमय्या यांनी दाेन वेळा मालेगावला भेट देऊन पत्रकार परिषद घेत याबाबत वक्तव्य केलं होतं. हा सर्व 100 काेटींचा व्यवहार असून हा पैसा ‘व्हाेट जिहाद'चा असल्याचा आराेप त्यांनी केला होता.
( नक्की वाचा : व्होट जिहाद' साठी 125 कोटींचं फंडिंग? सोमय्यांनी सांगितलं कसा झाला सर्व व्यवहार )
या प्रकरणी छावणी पाेलिस ठाण्यात सिराज माेहम्मद याच्यासह नामकाे बँकेच्या दाेघा अधिकाऱ्यांसह पाच जणांविराेधात गुन्हा दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली. ईडीने मागील महिन्यात प्रकरणाचा सूत्रधार सिराज अहमद आणि संगमेश्वर भागात राहणाऱ्या मिलन पटेल या हवाला एजंटच्या घरावर छापा मारीत सखोल चौकशी केली होती. मालेगावातून तरुणांची फसवणूक करून काढण्यात आलेल्या रकमेपैकी काही रकम मुंबई , सुरत आणि अहमदाबादला पाठवल्याचे तपासात समोर आले होते.
मागील आठवड्यात ईडीने मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापे टाकून गुन्ह्यातील मुख्य संशयित मेहमूद भगाडशी संबंधित बँक खात्यांची तपासणी करीत सुमारे 13 काेटींची राेकड हस्तगत केली. प्राथमिक चाैकशीत देशभरातील 21 राज्यातील 201 बँक खात्यातून व्यवहार झाल्याचे आणि हे पैसे 6 ते 10 नाेव्हेंबर या चारच दिवसात जमा झाल्याचेही निष्पन्न झाले.
( नक्की वाचा : Rohingya in Pune: रोहिंग्यानं थेट पुण्यात बांधलं घर, 500 रुपयात मिळवलं आधार कार्ड )
काेल्हापूरमधून 1 काेटी 90 लाख, पुण्यातील तीन बँकांच्या खात्यातून 2 काेटी 20 लाख, मुंबईतील 3 बँकातील 5 खात्यातून 2 काेटी 80 लाख जमा झाले आहेत. गुन्ह्यात स्थानिक पाेलिसांसह थेट ईडीच्या मुंबई पथकाकडून तपास सुरू असतानाच सीबीआयकडूनही चाैकशी केली जात असल्याची माहिती आहे. मालेगाव येथील नामकाे बँक व महाराष्ट्र बँकेसह राज्यभरातील ज्या १० हून अधिक बँकांमध्ये हे पैसे कसे आले आणि काेणत्या खात्यातून ते वर्ग झाले याचीही तपासणी आयकर विभाग करीत आहे. हा पैसा व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप झाल्यानं त्यास राजकीय वळण मिळाले आहे.
यापूर्वी या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रायल, फायनान्स इंटिलिजेस ब्यूरो, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा या तपास यंत्रणा तपास करीत आहेत.आता एटीएसही तपास करणार असल्याचे सूतोवाच भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिल्याने हा पैसा टेरर फंडिंगसाठीही वापरण्यात आल्याचा संशय बळावला आहे.