पावसाचा आनंद क्षणात विरला! बदलापुरातील पोतदार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षिकेचा दुर्देवी अंत

शिक्षिकेच्या मृत्यूनंतर शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापूर (Badlapur Hit and Run Case) मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या पुलावर हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहलीला गेलेल्या एका महिला शिक्षिकेला कारने धडक दिली होती. यानंतर उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. अखेर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिक्षिकेच्या मृत्यूनंतर शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बदलापूरमध्ये शिक्षिकेचा हिट अँड रनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या कार चालकाला बदलापूर ग्रामीण पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.

नक्की वाचा - हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

बदलापूर मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पुलावर हा हिट अँड रनचा प्रकार घडला. अंबरनाथच्या (Potdar International School) पोतदार इंटरनॅशनल शाळेचे शिक्षक बारवी धरण परिसरात पावसाळी सहलीला आले होते. सुमारे 15 ते 20 शिक्षकांचा ग्रुप सहलीचा आनंद घेत असताना एका भरधाव कारने सुनीता पिंटूकर या शिक्षिकेला धडक दिली. या घटनेत सुनीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक तिथून पळून गेला. यासंदर्भात बदलापुर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारचालक सिद्धेश माळवे याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement