Badlapur News : बदलापुरात फक्त 25 हजारांसाठी मातृत्वाचा लिलाव,बड्या डॉक्टरांच्या गळ्याभोवती फास आवळला

Badlapur News: या धक्कादायक प्रकरणात आतापर्यंत 40 पीडित महिलांची माहिती समोर आली असून हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Badlapur News: या प्रकरणात लवकरच बड्या डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता आहे.
बदलापूर:

Badlapur News:  बदलापूरमध्ये महिलांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांचे स्त्री बीज काढून विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक प्रकरणात आतापर्यंत 40 पीडित महिलांची माहिती समोर आली असून हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी तीन महिला आरोपींना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये काही बड्या डॉक्टरांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून लवकरच या डॉक्टरांनाही बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.

तपासात उघड झालेली धक्कादायक मोडस ऑपरेंडी

या प्रकरणातील अटक आरोपी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजूषा वानखेडे यांनी पोलीस चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. या महिला गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातील गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून हेरण्याचे काम करत होत्या. 

या महिलांना स्त्री बीजांची संख्या वाढवण्यासाठी ठराविक इंजेक्शन दिली जात होती आणि ही इंजेक्शन देण्याचे कामही आरोपी महिलाच करत होत्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीडित महिलांना रुग्णालयात नेऊन डॉक्टरांच्या मदतीने त्यांची स्त्री बीजे काढली जात होती. एका महिलेकडून स्त्री बीज घेतल्यावर तिला 25,000 ते 35,000 रुपये दिले जात होते.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )

बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलांची पिळवणूक

वैद्यकीय नियमानुसार एका महिलेकडून स्त्री बीजे घेण्याची ठराविक मर्यादा असते, मात्र या टोळीने पैशांच्या हव्यासापोटी सर्व नियम धाब्यावर बसवले होते. एकाच महिलेकडून वारंवार स्त्री बीजे काढण्यासाठी ही टोळी बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांचा आधार घेत होती. वेगवेगळ्या नावांनी कागदपत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेकदा ही प्रक्रिया करून घेतली जात होती, ज्यामुळे संबंधित महिलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

या रॅकेटचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते इतर राज्यांमध्येही पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एका तक्रारीमुळे फुटली  वाचा

हे संपूर्ण रॅकेट अत्यंत गुप्तपणे सुरू होते, मात्र एका पीडित महिलेला दिलेल्या आश्वासनानुसार पैसे न मिळाल्याने हे प्रकरण उजेडात आले. या महिलेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि सर्व आपबिती सांगितली. आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. 

Advertisement

उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांचा सहभाग स्पष्ट झाला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

( नक्की वाचा : Pandharpur News :काळ आला होता सासूसाठी पण वेळ आली नवऱ्याची; अंगावर काटा आणणारी पंढरपूरची घटना! )

आंतरराज्य कनेक्शनचा तपास

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. सध्या तरी हे रॅकेट आंतरराज्य स्तरावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिलांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने आता पुढील चौकशीत यामागील मुख्य सूत्रधार आणि सहभागी डॉक्टरांची नावे समोर येतील. सामान्य घरातील स्त्रियांनी केवळ गरिबीमुळे स्वतःच्या शरीराचा असा व्यापार केल्याचे समोर आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement