जाहिरात

Badlapur : मुंबई-ठाण्यात एजंटचे जाळे, सूत्रधार कोण? फार्मासीस्टच्या अटकेने स्त्री बीज तस्करी प्रकरणाला नवे वळण

Badlapur Egg Trafficking Case: बदलापूरमधील स्त्री बीज तस्करी प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे.

Badlapur : मुंबई-ठाण्यात एजंटचे जाळे, सूत्रधार कोण? फार्मासीस्टच्या अटकेने स्त्री बीज तस्करी प्रकरणाला नवे वळण
Badlapur Egg Trafficking Case: सर्व आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर:

Badlapur Egg Trafficking Case: बदलापूरमधील स्त्री बीज तस्करी प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये एका नामांकित कंपनीच्या फार्मासीस्टसह एकूण चार जणांना पोलिसांनी अंबरनाथ न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून मुंबई आणि ठाणे परिसरात स्त्री बीज विक्रीचे मोठे जाळे पसरल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे अपडेट?

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्करीमध्ये सुमित सोनकांबळे नावाच्या फार्मासीस्टचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हा फार्मासीस्ट डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ल्याशिवाय महिलांना स्त्री बीजांची संख्या वाढवण्यासाठी इंजेक्शनचा पुरवठा करत होता. 

विशेष म्हणजे, अटकेपूर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलमधील सर्व महत्त्वाचा डेटा डिलीट केला आहे, ज्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरत आहे. ठाण्यातील एका कार्यालयातून हे आयव्हीएफ सेंटर बेकायदेशीरपणे चालवले जात होते, जिथे गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केले जात असे.

( नक्की वाचा : Malegaon News : मालेगाव महापालिकेत चक्क नमाज पठण; व्हिडिओ व्हायरल होताच नाशिकमध्ये खळबळ, प्रकरण काय? )

या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबूकस्वार, मंजूषा वानखेडे आणि फार्मासीस्ट सुमित सोनकांबळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच उल्हासनगरमधील एका रुग्णालयातील कर्मचारी सोनल ग्रेलवाल हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सरकारी वकील आणि तपास अधिकारी राजेश गज्जर यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, या टोळीचे एजंट मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. महिलांकडून मिळवलेली स्त्री बीजे कुठे आणि कोणाला विकली जात होती, याचा शोध घेणे आता आवश्यक झाले आहे.

आरोपींच्या नातेवाईकांनी फेटाळले आरोप

दुसरीकडे, आरोपींच्या नातेवाईकांनी आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. वकिलांच्या मते, पकडण्यात आलेल्या महिला या केवळ एजंट म्हणून काम करत होत्या आणि त्यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. 

आरोपी गाडेकर यांच्या घरात सापडलेली औषधे ही त्यांच्या आजारी पती आणि मुलासाठी आणली होती, असा दावाही त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या औषधांचा कोणताही केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असेही वकिलांनी नमूद केले.

( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )

 रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? 

आरोपींचे वकील दिलीप वळंज यांनी असा आरोप केला आहे की, या गुन्ह्यातील खरे मास्टरमाईंड, मोठे डॉक्टर्स आणि मोठी रुग्णालये अजूनही पडद्यामागेच आहेत. पोलिसांनी केवळ सामान्य महिलांना अटक केली असून, या रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या माशांना अद्याप हात लावलेला नाही. गरजू महिलांना 25 हजार रुपये ते 30 हजार रुपये देऊन त्यांच्या अंडाशयाची विक्री केल्याचा पोलिसांचा दावा असला तरी, त्याचा कोणताही न्यायिक पुरावा समोर आलेला नाही. आता पोलीस कोठडी दरम्यान बदलापूर पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून मुख्य सूत्रधाराला अटक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com