Badlapur News : जेजेनंतर बदलापुरातील नामांकित ब्लड बँकेला टाळं; तुकाराम मुंढे आता 'रक्तचोरी'चा भांडाफोड करणार

धक्कादायक बाब म्हणजे, रक्तपेढीने कोणतीही तपासणी न करताच ५० रक्तपिशव्या बदलापूरच्या या ब्लड बॅकेत हस्तांतरित केल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Badlapur News : नियमबाह्य कारभार आणि रक्तचोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अखेर रद्द केला. या संपूर्ण प्रकरणात बदलापूर येथील 'माया ब्लड सेंटर'चं कनेक्शन समोर आलं होतं. तपासणी न करताच तब्बल ५० रक्तपिशव्या बदलापूरला पाठवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. 

नेमके प्रकरण काय?

जून महिन्यात एफडीएने जे.जे. महानगर रक्तपेढीत अचानक तपासणी केली होती. या तपासणीत औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं समोर आलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रक्तपेढीने कोणतीही तपासणी न करताच ५० रक्तपिशव्या बदलापूरच्या 'माया ब्लड सेंटर' येथे हस्तांतरित केल्या होत्या. रक्तपेढीने या बदलापूर कनेक्शनबाबत एफडीएला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे स्पष्टीकरण अत्यंत असमाधानकारक असल्याने एफडीएने ते फेटाळून लावले. आणि ही थेट 'रक्तचोरी' व रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याचा ठपका ठेवला.

Advertisement

तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी

  • बदलापूरला अवैध रक्त पुरवठा : योग्य पडताळणी आणि तपासणी न करता ५० रक्तपिशव्या बदलापूरच्या माया ब्लड सेंटरला पाठविण्यात आल्या.
  • शीतसाखळीत बिघाड: रक्त आणि रक्तघटक सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान राखण्यात मोठी हलगर्जी.
  • सुरक्षिततेचा अभाव : जैववैद्यकीय कचरा आणि रक्ताचे नमुने अत्यंत अयोग्य पद्धतीने साठवणं.
  • अपूर्ण नोंदी : उपकरणांचे कॅलिब्रेशन न करणे, तापमान नोंदी आणि दस्तावेजीकरणामध्ये गंभीर त्रुटी आढळणे.
  • रक्तदात्यांची सुरक्षा धोक्यात : रक्तदात्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा आणि उपकरणांचा अभाव असणे.

नक्की वाचा - उल्हासनगरमध्ये हिट अँड रन; मुथा गोल्ड व्यावसायिकाचं पळण्याच्या नादात संतापजनक कृत्य, एकाचा जागीच मृत्यू

यापूर्वी एफडीएने या रक्तपेढीचा परवाना निलंबित केला होता आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, रक्तपेढीकडून बदलापूरला पाठवलेल्या 50 रक्तपिशव्यांबाबत आणि इतर त्रुटींबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करता हा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ब्लड बँकेला टाळे लागले आहे. या कारवाईमुळे आता बदलापूरमधील 'माया ब्लड सेंटर' ला झालेल्या या रक्तपुरवठ्याची आणि एकूणच या रॅकेटची सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.