Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक हिट-अँड-रनची घटना समोर आली आहे. चारचाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत घटनास्थळावरून पळ काढून नामांकित गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा पसार झाला होता. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याण येथील गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अविनाश मुथा हा प्रकाश मुथा यांचा मुलगा आहे. प्रकाश मुथा हे कल्याणमधील नामांकित बिल्डर, गोल्ड व्यावसायिक आणि अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.
कार मागे घेत पुन्हा जखमी वयोवृद्धांच्या अंगावरुन चालवली कार...
उल्हासनगर क्रमांक 1 परिसरातील बिर्ला गेटसमोर दुचाकीवरून दोन जण शहाड स्टेशनचा दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. त्यापैकी एका व्यक्तीच्या अंगावर कार गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्याने कार चालकाने वाहन काही अंतरावर थांबवले. मात्र, आरोपानुसार त्याने कार मागे घेत पुन्हा जखमी वयोवृद्धाच्या अंगावरून वाहन चालवत तेथून पलायन केले. या घटनेत देवेंद्र सिंह राजपूत यांच्या मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या मुलगा संजय सिंग राजपूत हा गंभीर इतर जखमी झाला आहे.
या प्रकरणातील आरोपी अविनाश मुथा हा कल्याणमधील एक नामांकित गोल्ड व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी डीसीपी सचिन गोरे यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे कल्याण आणि उल्हासनगर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world