आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : झोका...लहानपणातील एक आवडीचं ठिकाण. लहानग्यांसह मोठ्यांनाही झोक्याबाबत वेगळंच आकर्षण असतं. मात्र हेच आकर्षण किंवा आनंद एखाद्याचा जीव घेऊ शकतो असा कधी कोणी विचारही केला नसेल. बीडच्या माजलगावातून अशीच एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
खेळता खेळता अघटित घडलं...
घरात खेळता खेळता अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. खंडोबा मैदान परिसरात राहणारी वृंदा समीर रूद्रवार ही मुलगी मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर झोका खेळत होती. झोका पकडण्यासाठी ती खुर्चीवर चढली असता खुर्ची अचानक कलंडली आणि झोक्याची दोरी गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला. या भीषण अपघातात वृंदाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
कुटुंबाला धक्का...
घराच्या वरच्या मजल्यावर लेक झोका खेळतेय. मात्र बराच वेळ वृंदा खाली आली नव्हती. जेवायला खाली न आल्याने आई वरच्या मजल्यावर गेली असता समोरील प्रकार पाहून तिला धक्काच बसला. या घटनेने रूद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुद्रवार कुटुंबासह संपूर्ण माजलगाव शहर हळहळ व्यक्त करत आहे.