Doctor Death Case: हिरोईनसारख्या दिसणाऱ्या डॉक्टर बायकोला मारून टाकलं, 'चीटर' सर्जनच्या 'चॅट'मुळे झाला उलगडा

Bengaluru Doctor Murder: मृत महिला ही त्वचारोगतज्ज्ञ होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी हा सर्जन आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बंगळुरू:

बंगळुरू  शहरात 6 महिन्यांपूर्वी एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर तिची हत्या करण्यात आली असल्याच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. मृत महिला ही त्वचारोगतज्ज्ञ होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी हा सर्जन आहे. मृत महिलेचे नाव कृतिका असून तिचा महेंद्रनेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कृतिकाला ठार मारल्यानंतर महेंद्रने त्याच्या प्रेयसीला मेसेज पाठवला होता की, 'तुझ्यासाठी बायकोला मारून टाकलंय.' महेंद्रवर पोलिसांना संशय असल्याने त्यांनी त्याचा फोन ताब्यात घेतला होता. फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत त्याने प्रेयसीसोबत केलेलं चॅट सापडलं होतं. कोणाला कळू नये यासाठी तो हे चॅटींग डिजिटल पेमेट अॅपवर करत होता.  

नक्की वाचा: शिक्षकच झाला भक्षक! विद्यार्थिनीशी गैरकृत्य, लिफ्टमध्ये नेलं अन्...

औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू

21 एप्रिल रोजी डॉ. महेंद्र रेड्डी याने त्याची पत्नी डॉ. कृतिका रेड्डी हिला ठार मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ऑपरेशनपूर्वी देण्यात येणाऱ्या गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस दिल्याने कृतिकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृतिकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पतीनेच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. महेंद्र आणि कृतिका यांचे लग्न 26 मे 2024 रोजी झाले होते आणि दोघेही बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात कार्यरत होते.

सुरूवातीपासूनच महेंद्रवर संशय

कृतिकाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे नमुने पाठवण्यात आले होते. या एफएसएल अहवालात कृतिकाच्या शरीरामध्ये प्रोपोफोल या अतितीव्र गुंगीच्या औषधाचे घटक सापडले होते. त्यामुळे कृतिकाचा मृत्यू नैसर्गिक नसावा तिचा खून करण्यात आला असावा असा संशय होता. पोलिसांनी महेंद्रच्या घराची झडती घेतली होती. पोलिसांना तपासणीदरम्यान भूल देण्यासाठी डॉक्टर वापरत असलेली उपकरणे आणि औषधे सापडली होती.   

नक्की वाचा: महिला डॉक्टरला 'न्याय' मिळणार! अंधारेंच्या आंदोलनानंतर पोलिसांचे मोठे आश्वासन

प्रेयसीचीही केली चौकशी

कृतिकाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करताना आपला संशय जावयावरच असल्याचे म्हटले होते. 15 ऑक्टोबर रोजी महेंद्रला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रने आपल्या डॉक्टरी कौशल्याचा वापर करून कृतिकाचा मृत्यू नैसर्गिक होता असं भासवण्याचा प्रयत्न केला होता. बंगळुरूचे पोलिस आयुक्त सीमंथ कुमार सिंग यांनी सदर घटनेबद्दल बोलताना म्हटले की, आतापर्यंत जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरून हा खून महेंद्रनेच केल्याचे दर्शवत आहेत. महेंद्रनेच कृतिकाला रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्याने त्यावेळी अनेक गोष्टी दडवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी महेंद्रच्या प्रेयसीचीही चौकशी करून तिचा जबाब नोंदवला आहे, मात्र तिची ओळख उघड केलेली नाही.

Advertisement
Topics mentioned in this article