जाहिरात

Bhigwan Kidnapping Case: तरुणीला आईकडे जायचं नाही, मग कुठे राहणार? पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? वाचा सर्व अपडेट

Bhigwan Kidnapping Case:  पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

Bhigwan Kidnapping Case: तरुणीला आईकडे जायचं नाही, मग कुठे राहणार? पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? वाचा सर्व अपडेट
Bhigwan Kidnapping Case:  या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भिगवण, पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Bhigwan Kidnapping Case:  पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.  या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बारामती आणि भिगवण परिसरात खळबळ माजवून देणाऱ्या या प्रकरणावर अखेर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची बाजू मांडली आहे. 

एका बाजूला मुलीचे कुटुंबीय अपहरणाचा दावा करत असताना, दुसरीकडे स्वतः तरुणीने आणि आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होऊन या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. यामुळे हे प्रकरण प्रेमविवाह की दबावतंत्राचा भाग, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलीस तपासात काय आढळले?

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले की, भिगवण पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात संबंधित तरुणी आणि आरोपी झहीर शेख हे स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

पोलिसांनी या दोघांचेही जबाब नोंदवले असून कायद्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे. विशेष म्हणजे तरुणीने यापूर्वीच सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतःच्या इच्छेने गेल्याचे स्पष्ट केले होते, ज्याची आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

( नक्की वाचा : Pune News : खळबळजनक! इंदापूर तालुक्यात 25 मुली जिहाद्यांच्या ताब्यात? पडळकरांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला )

न्यायालयीन प्रक्रिया आणि परस्परविरोधी दावे

संबंधित तरुणीला जबाब नोंदवण्यासाठी बारामती सत्र न्यायालयात नेण्यात आले होते, जिथे मोठा नाट्यमय प्रसंग घडला. तरुणीने न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदवला असून तिने आपल्या आईकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, मुलीच्या आईने आणि नातेवाईकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून मुलीवर दबाव असल्याचा दावा केला आहे. 

मुलीची सुरक्षितता लक्षात घेता तिला कोणाकडे पाठवायचे किंवा महिला वस्तीगृहात ठेवायचे, याचा निर्णय कायद्यानुसार घेतला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आईला आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांची भेटही घडवून आणली गेली आहे.

( नक्की वाचा : Biryani Scam : बिर्याणीच्या एका प्लेटने उघड केला 70,000 कोटींचा महाघोटाळा, गुन्हेगारांनी वापरली भलतीच शक्कल )

राजकीय आरोपांमुळे वातावरण तापले

या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढू लागला आहे. आरोपी झहीर शेख याचा चुलता अजहर शेख हा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. आमदारांच्या पाठबळामुळेच हे धाडस झाले असावे, असा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी न्यायालयाच्या परिसरात राहुल कुल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

या राजकीय आरोपांबाबत विचारले असता, पोलीस अधीक्षकांनी अत्यंत सावध भूमिका घेत 'यावर मी काही बोलू शकत नाही' असे स्पष्ट केले. पोलीस केवळ पुराव्यांच्या आधारावर आणि गोपनीय पद्धतीने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तपासाची पुढील दिशा काय?

पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला आपल्या ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे गिल्ल यांनी स्पष्ट केले. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. 

सध्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्रथम प्राधान्य असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक बारकाव्याचा अभ्यास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com