देवा राखुंडे, प्रतिनिधी
Bhigwan Kidnapping case : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरामध्ये एका तरुण मुलीच्या अपहरणाची घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांच्या वतीने भिगवणमध्ये विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
ही केवळ एका मुलीच्या अपहरणाची साधी घटना नसून, इंदापूर तालुक्यात आतापर्यंत वडिलांचे छत्र हरवलेल्या तब्बल 25 मुली जिहाद्यांनी हडप केल्या आहेत, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप पडळकर यांनी यावेळी केला. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी रात्री भिगवण परिसरातून एका मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार समोर आली होती. या घटनेनंतर पडळकर यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, संबंधित मुलगी डी फार्मसीचे शिक्षण घेतलेली सुशिक्षित तरुणी आहे, तर ज्याने तिचे अपहरण केले तो मुलगा चोऱ्या करणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. विशेष म्हणजे, या मुलीचे येत्या 22 तारखेला लग्न ठरले होते. अवघ्या दोन-चार दिवसांवर लग्न आले असताना तिचे अपहरण केले गेले, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पडळकर यांनी नमूद केले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अझर याच्यावर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल करत पडळकर यांनी संताप व्यक्त केला. त्याने एका पोलीस अधिकाऱ्यावरही हात टाकला होता, तरीही तो मोकाट कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या अझरवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पोलिसांनी आमची मुलगी सुरक्षितपणे परत आणून द्यावी, तिचे तिच्या आईशी आणि आजीशी बोलणे करून द्यावे, तरच सत्य समोर येईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )
मुलीचा व्हिडिओ Viral
यादरम्यान सोशल मीडियावर संबंधित मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने मर्जीने गेल्याचा दावा केला आहे. मात्र, पडळकर यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुलीवर जबरदस्ती करून हा व्हिडिओ बनवला गेला असून तो पोलीस आणि नातेवाईकांना पाठवून दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. व्हिडिओमध्ये पाहिल्यास त्या मुलीची टिकली गायब असल्याचे दिसते, यावरूनच दबावाचा प्रकार स्पष्ट होतो, असे ते म्हणाले. जोपर्यंत मुलगी प्रत्यक्षात समोर येत नाही, तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आमदार पडळकर यांनी केवळ या एका घटनेवरच नव्हे, तर तालुक्यातील लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकारांवरही भाष्य केले. इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीला देखील वेढा टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई ही धर्माचीच होती, याची आठवण करून देत हा देश हिंदू होता आणि राहिला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकरच येत असून त्यानंतर अशा प्रवृत्तींना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world