मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Bhondu Baba Crime News : नाशिकमध्ये भोंदू बाबा खरातचे प्रकरण गाजत असताना जळगाव मध्येही एका भोंदू बाबाचा कारनामा उघड झाला आहे. अघोरी पूजा,करणी बाधा आणि गुप्तधनाच्या नावाखाली भोंदूबाबाने त्याच्या पत्नीला हाताशी घेऊन एका महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोंदू बाबा व त्याच्या पत्नी विरोधात 3 वर्षांपूर्वीच गुन्हा दाखल केला होता. मात्र अद्यापही हा भोंदूबाबा व त्याची पत्नी हे फरार आहेत. विशेष म्हणजे या भोंदूबाबाची पत्नी ही मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची देखील माहिती आहे.
ललित पाटील पाटील असं या भोंदूबाबचं नाव आहे. तर महिमा उर्फ मनोरमा पाटील असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. अध्यात्मिकतेचा व श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेक भोंदू बाबांकडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.अशाच एका भोंदूबाबाचा कारनामा जळगाव मध्येही उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भोंदूबाबाची पत्नी पोलीस दलात कार्यरत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
तक्रारदार महिला आणि भोंदूबाबाची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या.तेव्हापासून या दोघींचा परिचय होता. त्यामुळे अधून मधून फोनवर तक्रारदार महिला व महिमा पाटील यांचे बोलणे व्हायचे.चार वर्षांपूर्वी तक्रारदार महिला व तिच्या पतीसोबत वाद झाला.या वादातून कौटुंबिक कलह निर्माण झाले. त्यादरम्यान महिमा उर्फ मनोरमा पाटीलचा फोन आला. तिने मैत्रिण म्हणून तिला कौंटुबिक कलहाबाबत माहिती दिली.हीच संधी साधत महिमा पाटीलने तिच्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगत महिलेची पतीसोबत भेट घडवून दिली.
नक्की वाचा >> BMC मध्ये चोरी! शिवसेना नगरसेविका लक्ष्मी भाटियांच्या पर्समधून 'लक्ष्मी' चोरली, सभागृहात किती रुपये लांबवले?
या भेटीदरम्यान भोंदूबाबा ललित पाटील यांनी अघोरी विधी केला. महिलेला अघोरी पूजा करण्यास भाग पाडले.तेव्हापासून तक्रारदार महिलेकडून भोंदूबाबा व त्याच्या पत्नीने महिलेकडून सतत पैशांची मागणी केली. एवढेच नाही तर गुप्तधनाचे आमिष दाखवून राजस्थान मध्यप्रदेश व विविध ठिकाणी अघोरी पूजा करून लाखो रुपये लुबाडले. पतीच्या अंगातील वाईट शक्तीसह घरातील करणी बाधा काढण्याच्या नावाखाली वारंवार मोठी रक्कम या भोंदू बाबा ने व त्याच्या पत्नीने महिलेकडून हडप केले.
नक्की वाचा >> Akola News: सासरचे लोक म्हणाले "तुला विकत आणलं..", विवाहितेचा जीव गेला, अकोल्यात ठिय्या आंदोलन
त्यानंतर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच महिलेने महिमा पाटील हिच्याकडे पैशांची मागणी केली.मात्र पैशांची मागणी केल्याने भोंदूबाबा ललित पाटील यांनी आपण अघोरी असल्याचे धमकावत पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार महिलेने थेट पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील या दोघांविरोधात 2022 मध्ये रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिलेने 15 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन फरार भोंदूबाबा व पोलीस कर्मचारी पत्नी या दोघांचा शोध घेऊन त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.