
Bhopal Engineer Wife: भोपाळच्या अयोध्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घटस्फोटाची नोटीस मिळाल्याने व्यथित झालेल्या एका महिला इंजिनिअरने आपल्या घरात आत्महत्या केली. महिलेच्या घरातून 2 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तिने आपल्या मृत्यूसाठी पती, त्याचे संपूर्ण कुटुंब आणि पतीच्या 2 गर्लफ्रेंड्सला जबाबदार धरले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. शिवाय तिच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. शिवाय सुसाईड नोट तिने जे काही लिहीलं त्याने सर्व जण हादरून गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव किरण मीना असे आहे. तिचा मृतदेह तिच्याच घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. किरणचे लग्न आयुर्वेदिक डॉक्टर संजय देशवानी यांच्याशी झाले होते. त्यांच्या लग्नाला जवळपास 14 वर्ष झाली होती. चौकशीत असे समोर आले आहे की, या दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये बराच काळ वाद सुरू होता. पोलिस सूत्रांनुसार, याच कारणामुळे पती संजय देशवानीने किरणला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. ज्यामुळे ती नैराश्यात गेली होती. नवरा आपल्याला सोडणार असं तिला वाटत होतं.
घटनास्थळी सापडलेल्या 2 पानांच्या सुसाईड नोटमध्ये किरण मीना यांनी आपल्या मृत्यूचे संपूर्ण सत्य लिहिले आहे. "माझा पती, त्याचे कुटुंब आणि त्याच्या 2 गर्लफ्रेंड्स माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत," असे किरणने स्पष्टपणे नमूद केले आहे. या महिलेने पती संजय देशवानी, त्याची आई, 3 बहिणी, दीर आणि पतीच्या 2 गर्लफ्रेंड्सवर सतत मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या आई-वडिलांना उद्देशून लिहिले आहे की "माझे अंत्यसंस्कार तुमची मुलगी म्हणून करा, कोणाची तरी सून म्हणून नाही. माझ्या पैशातूनच माझे अंत्यसंस्कार करा. मी खूप वाईट मुलगी आहे. मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सॉरी. असं तिने लिहीलं आहे.
घटस्फोटाच्या नोटिशेने किरणचे मन इतके खचले की तिला हे पाऊल उचलण्यास भाग पडले, असे सुसाईड नोटमधून दिसून येते.अयोध्या नगर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. सुसाईड नोटला महत्त्वाचा पुरावा मानून पोलिसांनी ती जप्त केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉक्टर पती संजय देशवानी, त्याचे कुटुंब आणि त्या 2 गर्लफ्रेंड्स यांच्यावर लावण्यात आलेल्या छळाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world