जाहिरात
This Article is From Sep 02, 2024

' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
अहमदनगर:

अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. या घटनेनंतर अहमदनगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against Nitesh Rane)

'मी चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे', असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता. (BJP Leader Nitesh Rane) यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, रामगिरी महाराज यांना विरोध केला तर मशिदीत घुसून एकेकाला मारू अशी धमकीही दिली. त्यांच्या या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत.   

या मोर्चात नितेश राणे म्हणाले की, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणातच हिंमत नव्हती. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे. हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला काही हाड नाही. पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो. मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय... मी हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

नितेश राणेंनी रत्नागिरीतही दिली धमकी...
रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ आहे. प्रशासन जो नियम हिंदू समाजाला लावतोय तोच नियम मुस्लीम समाजाला लावला पाहिजे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जो फरक केला जातो, तो प्रशासनाकडून थांबला पाहिजे. तो थांबला नाही तर रत्नागिरीतील हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारं तांडव आमच्या कोणाच्याही हातात राहणार नाही असा इशारा भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. या संदर्भात भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधला. 

नक्की वाचा - ठाकरे भडकले! 'गेट आऊट' ऑफ इंडिया करून दाखवा, मग्रुरीने माफी नको'

याबाबत नितेश राणे म्हणाले की, रत्नागिरीत हिंदू पण राहतात हे इथलं प्रशासन विसरलेलं आहे. रत्नागिरीमध्ये लांगूलचालनचे विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनधिकृत बांधकामं वाढली आहेत, ज्याला मदारचं स्वरूप दिलेलं आहे. मोहम्मद पैगंबरच्या शिकवणीमध्ये मदार विषयाला परवानगी आहे का हे मुस्लिम समाजाला मला विचारायचं आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना काढण्यात काय अडचण आहे. हिंदू समाजाने रत्नागिरीत कुठल्याही शासकीय जमिनीवर साधी टपरी बांधली तरी ती दोन तासांत हटविली जाते. प्रशासन जो नियम हिंदू समाजाला लावतं तोच नियम मुस्लिम समाजाला लावला पाहिजे.. रत्नागिरीत शरय्या कायदा लागू झाला आहे का, याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी सांगितलं.

नक्की वाचा - महायुतीत रस्सीखेच, भाजप आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा 

कारणं ऐकून, मोर्चे काढून, आवाज उठवून आमचा संयम आता संपलेला आहे. आता तारखेच्या अनुसार हे अनधिकृत बांधकाम काढलं नाही तर रत्नागिरीतील हिंदू समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झाला, कायदा -सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्ण जबाबदार इथलं प्रशासन राहील, प्रशासनाने अॅक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. दरम्यान इथे गोमांस विकणारे, कत्तलखाने चालवणारे आहेत. त्यांची नावं एसपी आणि प्रशासनाकडे दिली आहेत. त्याच्यावर कारवाई होते का पाहू. प्रशासनाने जर यापुढे आम्हाला परत परत याच पद्धतीची उत्तरं दिली, तर असे हिंदू समाजाला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचं सरकार किती काळ त्या खुर्चीवर ठेवतं हे आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्याबद्दल निर्णय घेऊ असा इशाराही राणेंनी यावेळी दिला. पोलीस प्रशासनातही काही सडके आंबे आहेत ते या लोकांना मदत करताहेत. अशा सडक्या आंब्यांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आम्ही खराब होऊ देणार नाही असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.