- मोसीन शेख, प्रतिनिधी
Prasad Lad Threatened: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी तत्काळ दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
प्रसाद लाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न?
आमदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळासह मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. हे शिष्टमंडळ आज (22 मे) आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. या नियोजित दौऱ्यासाठी प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगरमधील 'रामा इंटरनॅशनल हॉटेल' येथे थांबले होते. याच दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. फोनद्वारे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, त्यांना मारण्याची आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.
पोलिसांची सतर्कता आणि कारवाई
धमकीचा फोन येताच आणि हॉटेलमध्ये संशयास्पद हालचाली दिसताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत गुरुवारी (21 मे) अवघ्या एका तासाच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी हॉटेल 'रामा इंटरनॅशनल'बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
हल्ल्याच्या प्रयत्नाबाबत प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बातचित करताना सांगितले की, "पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, तसेच मारण्याची आणि गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. हॉटेलमध्येही घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आमचे पोलीस आणि गृहखाते सतर्क आहे. काल अवघ्या एका तासातच पोलिसांनी त्यांना अटक केली."
VIDEO: मनोज जरांगे यांच्या भेटीआधी प्रसाद लाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? काय झालं, कोण होते ते? । NDTV
आरोपींच्या भूमिकेबद्दल बोलताना लाड म्हणाले, "ज्यावेळी मराठा आंदोलन तीव्र होते, त्यावेळेस तुम्ही उलटसुलट बोललात, शिवीगाळ केली आणि आज चर्चेसाठी आलात, असा त्या आरोपींचा गैरसमज होता. पण मी येथे माझ्या मर्जीने आलेलो नाही. मनोज दादांच्या आवाहनानंतर आणि त्यांनी दिलेल्या निमंत्रणानंतरच मी या शिष्टमंडळासोबत चर्चेसाठी आलो आहे. त्यामुळे त्यांचा हा केवळ गैरसमज होता. मी पोलिसांनाही सांगणार आहे की, त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई न करता त्यांचा हा गैरसमज दूर करावा."
भेटीआधी प्रसाद लाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, मनोज जारांगेंची पहिली प्रतिक्रिया आली । NDTV मराठी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world