पुण्यातल्या रावेतमधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्ल्यू व्हेल गेमच्या (Blue Whale Online Game) व्यसनात रूनल सोसायटीतल्या एका 15 वर्षीय मुलाने रात्री 1 वाजता 14व्या मजल्यावरून उडी मारुन स्वतःचं जीवन संपवल्याचा प्रकार घडला आहे. आर्य शिरराव असं या मुलाचं नाव आहे. आर्य गेल्या सहा महिन्यांपासून ब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात अडकला होता. तो दिवसदिवसभरात आपल्या खोलीत बसून राहायचा. याशिवाय या काळात मृत्यूसंदर्भातील गाणी त्याला आवडू लागली होती. तो मोठ्या आवाजात मृत्यूसंदर्भातील इंग्रजीतील गाणी ऐकत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.
आर्यचे वडील नायजेरियात कामाला आहेत. मुलगा सहा महिन्यांपासून ब्लू व्हेल खेळत असावा असा अंदाज आहे. या काळात आर्य फार आक्रमक झाला होता. आई आणि भावाला मारहाण करीत होता. स्वत:च्या हातावर वर ब्लेड मारून घेत होता. सकाळी 8 वाजता खोलीत गेला की, सायंकाळपर्यंत बाहेर येत नव्हता. आर्यने एक सुसाईट नोट लिहिली आहे. त्यावर त्याने 'लॅाग आऊट नोट, हाऊ तो राईट सुसाईट नोट' असं लिहिलं आहे. याच्याशेजारी दोन इमोजी आहेत.
नक्की वाचा - हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू
आर्यच्या निमित्ताने ऑनलाइन व्हिडिओ गेमच्या व्यसनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आर्य 14 व्या मजल्यावर राहत होता. त्याच्या घराच्या बाल्कनीला कबुतरांसाठीची नायलॅानची जाळी लावलेली आहे. ती जाळी कशी कापायची आणि खाली उडी कशी मारायची याचे स्केच मुलाने उडी मारण्यापूर्वी तयार केले होते. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खूप चर्चेत आला होता. या गेमचा शेवटचा टप्पा म्हणजे स्वतःला संपवणं. अशातच हा गेम खेळत असताना प्रत्येक टप्पा पार करीत 15 वर्षांच्या आर्यने शेवटच्या टप्प्यात स्वतःला संपवलं अन् बाल्कनीतून उडी मारली.
आर्यबरोबर आणखी अनेक मुलं हा गेम खेळत होते. त्यांना यापासून वाचवावं अशी मागणी आर्यच्या वडिलांनी केली आहे.