- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील एका मुलाने स्वतःच्या आईला मृत घोषित करून बनावट मृत्युपत्र तयार केले
- आरोपीने नगरपरिषद कार्यालयात बनावट मृत्युपत्र सादर करून आईच्या बँक खात्यातील दहा लाख काढले
- पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमोल सराफ
आजच्या धावपळ आणि डिजिटल युगात काही जण पैशाकरता आपलपोटे किती होत चाललो आहेत याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे बुलढाण्यातील एका घडलेल्या घटनेवरून म्हणावे लागेल. सर्व काही पैसाच होत चालला आहे का? हे विचारण्याची वेळ या घटनेवरून दिसून येते. जन्मदाती आई आपल्याला संस्कार देते. हे जग दाखवते. तिला जिवंतपणे आपण या जगात निरोप देतो. अशा घटना समाजात घडत असतील तर सर्व काही संपलं असंच म्हणावं लागेल. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एका मुलाने आपल्या आईला मृत दाखवले. तिची फसवणूक करून तिच्या खात्यातील 10 लाख रुपयांवर डल्ला ही मारला. पण जेव्हा हा प्रकरा उघडकीस आला त्यानंतर त्या मुला विरोधात तिव्र प्रतिक्रीया उमटल्या.
प्रेमसिंग कमल सिंग राजपूत या महाभागाने आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी हे भयंकर कांड केले. स्वतःच्या जिवंत आईला त्याने मृत म्हणून घोषित केले. त्यानंतर बनावट मृत्युपत्र तयार केले. त्याच्या आधारे जळगाव जामोद नगरपरिषद कार्यालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे आरोपी मुलाने आईच्या बँक खात्यातील तब्बल दहा लाख रुपयांची मुदत ठेव FD मोडून रक्कम काढली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली. या संदर्भात 15 डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सुनील देविदास निकाळजे हे नगरपरिषदेत विद्युत अभियंता आहे. त्यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रेमसिंग कमल सिंग राजपूत याने आईच्या मृत्यू बाबत खोटे व बनावट स्वयंघोषणापत्र तयार केले. त्यानंतर ते नगरपरिषद कार्यालयात सादर केले. या बनावट कागदपत्राच्या आधारे आरोपीने नगरपरिषदकडून आईचे मृत्युपत्र प्राप्त केले. त्यानंतर बँकेत आईच्या नावाने असलेले सुमारे दहा लाख रुपयाची मुदत ठेव मोडून रक्कम काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी कौशल्याबाई राजपूत यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच यापूर्वी अनेक वेळा महिलेने नगरपरिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, आम्ही काही करू शकत नाही असे उडवा उडवीची उत्तर मिळाल्याने हतबल झाल्याची भावना त्या महिलेने बोलून दाखवली. या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विविध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत.
नक्की वाचा - Latur News: पैशाची हाव, हत्येचा बनाव! एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश
ही माहिती मिळताच आई कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. मी जिवंत आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्या पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. ठाणेदारांनी तक्रारही घेतली नाही, असा थेट आरोप कौशल्याबाईंनी केला आहे. आज या वृद्ध महिलेपाशी जगण्यासाठी काहीच उरलेले नाही. ना पैसे, ना कुटुंबाचा आधार, ना प्रशासनाची साथ नगर परिषदेच्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? आणि जिवंत असतानाही मृत ठरवलेल्या कौशल्याबाईला न्याय मिळणार तरी कधी? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world