Dadar News: प्रवासादरम्यान टोल भरण्यावरून झालेल्या वादानंतर टॅक्सी चालकाने एका महिला प्रवाशाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर "कॉल गर्ल" म्हणून तिचा उल्लेख केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) दिली. चालक टॅक्सी सेवा देणाऱ्या एका कंपनीशी संबंधित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील रहिवासी असलेल्या विनय कुमार यादवने सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेची खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर केली. पण आरोपीने तिची खासगी माहिती कशी मिळवली? हे पोलिसांनी सांगितले नाही.
नेमके काय घडलं होतं?
महिलेने दक्षिण मुंबईतूनह दादर परिसरात जाण्यासाठी टॅक्सी बुक केली होती. प्रवासादरम्यान यादवने तिला एका ठिकाणी टोल भरण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यादवने कथिक स्वरुपात महिलेला वारंवार कॉल करून शिवीगाळही केली, यानंतर महिलेने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला.
काही वेळानंतर महिलेला अनोळखी लोकांचे फोन येऊ लागले. चौकशी केली असता धक्कादायक गोष्ट तिच्या निर्दशनास आली. तिच्या फोटोचा वापर करुन बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये तिचा उल्लेख 'कॉल गर्ल' असा करण्यात आला होता, जेथे तिची खासगी माहिती देखील नमूद करण्यात आली होती.
(नक्की वाचा: बसमध्ये महिलेच्या गुप्तांगाला गुपचूप स्पर्श केला..महिलेनं व्हिडीओ काढून वासनांधाच्या कानाखाली जाळ काढला अन्..)
महिलेने पोलिसात घेतली धाव
महिलेने सोशल मीडिया कंपनीकडे तक्रार केली असता हे बनावट अकाउंट वाद घालणाऱ्या टॅक्सी चालकाने तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर महिलेनं दादर पोलिसात धाव घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे अपशब्द वापरल्याप्रकरणी तसेच बदनामी केल्याप्रकरणी टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यादवच्या मोबाइल क्रमांकावरुन तो झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवलीय.