कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टरांकडून हलगर्जीपणा? पत्नीची तब्येत बिघडल्याने पतीची पोलिसांत धाव

पाटण येथे शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. नागेश ननावरे आणि डॉ. अभिषेक डुबल यांच्याविरोधात शशिकांत पाटील यांनी सातारा पोलीस अधिक्षकांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो प्रतिकात्मक आहे
पाटण, सातारा:

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सोनवडे येथे शासकीय रुग्णालयात एका महिलेवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत तिच्या पतीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. नागेश ननावरे आणि डॉ. अभिषेक डुबल यांच्याविरोधात शशिकांत पाटील यांनी सातारा पोलीस अधिक्षकांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे.

नेमकं झालं तरी काय?

शशिकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांची पत्नी गौतमी यांच्यावर २० मे रोजी सकाळी सोनवडे येथील शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही गौतमी पाटील यांना प्रचंड वेदना होत होत्या. सलाईन लावलं की त्रास कमी होईल असं सांगत डॉक्टरांनी गौतमी यांना सलाईन लावलं. २२ मे रोजी गौतमी यांना डिस्चार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर त्रास अधिकच वाढला -

परंतु घरी परतल्यानंतरही गौतमी यांचा त्रास कमी झाला नव्हता. पत्नीचा त्रास कमी होत नव्हता म्हणून शशिकांत पाटील यांनी पुन्हा रुग्णालय गाठलं. यावेळी डॉक्टरांनी गौतमी यांना वेदनाशमक इंजेक्शन दिलं. परंतु तरीही गौतमी यांचा त्रास कमी होईना. ज्यामुळे सरकारी गाडीतून गौतमी यांना पाटण येथे नेण्यात आले.

अवश्य वाचा - 1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम

परंतु इथेही डॉक्टरांचा हलगर्जीपणा थांबला नसल्याचं शशिकांत यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पाटण येथे कोणतीही सोनोग्राफी न करता आपल्याला पत्नीला कराड येथे हलवण्यास सांगण्यात आल्याचं शशिकांत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Advertisement

अखेरीस कराडमध्ये उपचार सुरु, पण वेदना कायम -

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गौतमी यांना कराड येथे दाखल करण्यात आलं. परंतु तिकडेही त्यांच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही. याउलट ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे गौतमी यांना व्हेंटीलेटरवर ठेवावं लागलं. २४ मे रोजी शशिकांत यांना पत्नीला सातारा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यादरम्यानच्या काळात कराडमध्ये दोन रुग्णालयात गौतमी यांच्यावर उपचार झाले. अखेरीस या धावपळीतून त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सांगलीत समोर आलं धक्कादायक वास्तव -

सांगलीच्या भारती रुग्णालयात गौतमी यांची सीटी स्कॅन चाचणी झाली. यावेळी त्यांच्या लिव्हर व किडनीला इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. परंतु गौतमी यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांच्यात सुधारणा होईपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी कळवलं आहे. आपल्या पत्नीला झालेल्या त्रासाला डॉक्टर जबाबदार असल्याचं म्हणत शशिकांत यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे सातारा पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement