जाहिरात

Pune News: सावधान! व्हॉट्सॲपवर जनगणनेचा फॉर्म आलाय? क्लिक करण्यापूर्वी पोलिसांचा हा इशारा वाचा

Census Form Scam: देशात सध्या जनगणना आणि जातिनिहाय सर्वेक्षणाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे.

Pune News: सावधान! व्हॉट्सॲपवर जनगणनेचा फॉर्म आलाय? क्लिक करण्यापूर्वी पोलिसांचा हा इशारा वाचा
Pune News : सायबर चोरटे स्वतःची ओळख सरकारी अधिकारी किंवा एजंट म्हणून करून देतात. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Census Form Scam: देशात सध्या जनगणना आणि जातिनिहाय सर्वेक्षणाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. बनावट फॉर्म आणि संशयास्पद लिंक्सच्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरली जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे पद्धत?

सायबर चोरटे स्वतःची ओळख सरकारी अधिकारी किंवा एजंट म्हणून करून देतात आणि लोकांशी संपर्क साधतात. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे हे गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. जनगणना फॉर्म भरण्याच्या बहाण्याने किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. यासाठी विशिष्ट लिंक्स पाठवून त्याद्वारे माहिती गोळा केली जात आहे.

ही माहिती मागितली तर सावध व्हा

हे चोरटे नागरिकांकडून अतिशय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पॅन कार्ड तपशील, बँक खाते क्रमांक, ओटीपी आणि पिन क्रमांक यांचा समावेश असतो. तसेच विविध ओळखपत्रांची माहितीही विचारली जाते. एकदा का ही माहिती त्यांच्या हाती लागली की, बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.

( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )

काय आहे अधिकृत प्रक्रिया?

नागरिकांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणतीही अधिकृत जनगणना प्रक्रिया फोन कॉल किंवा व्हॉट्सॲपवरून तुमच्या वैयक्तिक किंवा बँक खात्याची खासगी माहिती कधीही मागत नाही. ही पूर्णपणे गोपनीय प्रक्रिया असून ती सुरक्षित मार्गांनीच राबवली जाते. त्यामुळे डिजिटल माध्यमातून अशी माहिती मागणाऱ्यांपासून दूर राहणेच फायद्याचे आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच अनोळखी गुगल फॉर्मवर आपली कोणतीही माहिती भरू नका.तुमचा ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. समोरची व्यक्ती कितीही अधिकृत वाटली तरीही हे टाळावे.

( नक्की वाचा : Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय? )
 

कुठे कराल तक्रार?

कोणत्याही कामासाठी केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा. दुर्दैवाने तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली असल्यास, वेळ न घालवता त्वरित 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय तुमच्या जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची रीतसर तक्रार नोंदवावी, जेणेकरून पुढील आर्थिक नुकसान टाळता येईल, असं आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com