जाहिरात

Badlapur News : बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी, ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!

ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे! त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीवरून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Badlapur News : बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी,  ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!

निनाद करमरकर, प्रतिनिधी

Badlapur News : बदलापुरात एका बड्या गृहप्रकल्पात ग्राहकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्ध्यापेक्षाही कमी क्षेत्रफळाचा फ्लॅट, वेळेत ताबा नाही, अन बिल्डर पैसेही परत करत नसल्यानं ग्राहकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. यानंतर सेशन कोर्टानं या बिल्डरचा अटकपूर्व जामीनही फेटाळल्यानं आता बिल्डरला अटक होण्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापूरच्या बेलवली परिसरात तुलसी सिग्नेचर हा मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पात उल्हासनगरच्या किशोर कदम यांनी 2,725 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट 1 कोटी 27 लाख 97 हजार 500 रुपयांना बुक केला होता. किशोर कदम यांनी दिलेल्या एफआयआर दाखल करण्यासाठी दिलेल्या फिर्यादीनुसार, या फ्लॅटचं पझेशन 2019 साली देण्याचं बिल्डर भावेन पटेल यांनी कबूल केलं होतं. मात्र विहित मुदतीत पझेशन न मिळाल्यानं कदम यांनी बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली असता बांधकाम बंद पडल्याचं त्यांना आढळलं, तसंच त्यांनी बुक केलेला फ्लॅट कागदावर 2725 स्क्वेअर फुटांचा असला, तरी प्रत्यक्षात 1124 स्क्वेअर फुटांचाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी बिल्डर भावेन पटेल यांच्याकडे बुकिंग रद्द करत पैसे परत मागितले. त्यानंतर 2023 साली त्यांच्यात समझोता होऊन बिल्डर भावेन पटेल याने ग्राहक किशोर कदम यांना व्याजासह 1 कोटी 65 लाख रुपये देण्याचं मान्य केलं, त्यापैकी 91 लाख 50 हजार रुपये कदम यांना देऊन उर्वरित 73 लाख 50 हजार रुपये ३ महिन्यात देण्याचं कबूल केलं होतं. मात्र आता त्याला 2 वर्ष उलटूनही बिल्डर भावेन पटेल हा पैसे परत करत नसल्यानं किशोर कदम यांनी पोलिसात धाव घेतली.

Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम

नक्की वाचा - Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम

किशोर कदम यांच्या तक्रारीवरून बदलापूर पश्चिम पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2025 रोजी बिल्डर भावेन पटेल, किंजल पटेल, रमेश पटेल यांच्याविरोधात आयपीसी 420, 406, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर बिल्डरने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात धाव घेतली, मात्र त्याचा जामीन फेटाळण्यात आला असून आता त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे. या प्रकरणात आता बदलापूर पश्चिम पोलिसांकडून बिल्डरला अटक होते? की हायकोर्टात जाण्यासाठी वेळ दिला जातो? याकडे बदलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.