जाहिरात

Badlapur News : 'दररोजचा जीवघेणा प्रवास', वेस्टनच्या मुलींकडून सेंट्रलच्या मुलांना लग्नास नकार

बदलापुरच्या २८ वर्षीय चेतना देवरुखकरचा रेल्वेच्या रुळाखाली आल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर सेंट्रल रेल्वेवर राहणाऱ्या प्रवाशांनी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला.

Badlapur News : 'दररोजचा जीवघेणा प्रवास', वेस्टनच्या मुलींकडून सेंट्रलच्या मुलांना लग्नास नकार

Central Railway local : ३१ जानेवारी रोजी बदलापुरातील सकाळी ८.१० वाजताच्या लोकलमधून पडल्याने २८ वर्षीय चेतना देवरुखकर हिचा मृत्यू झाला. चेतनाने चालती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. लोकलच्या डब्यात आधीच गर्दी होती. त्यामुळे तिला डब्यात शिरता आलं नाही आणि खांबावरुन हात सुटल्याने ती थेट खाली कोसळली. रुळाखाली आल्याने चेतनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापुरकरांनी लोकल सेवा आणि तेथील सार्वजनिक वाहतूक 'संकटांचा' पाढाच वाचला. 

बदलापुरातील लोकल सेवेचा गोंधळ...

बदलापुरात मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग राहतो. ही संख्या गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. मात्र लोकसंख्या वाढली त्या तुलनेत येथील सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा झालेली नाही. सध्या तर लोकल ३० ते ५० मिनिटं विलंबाने धावतात. यामुळे नोकरदारवर्गाला कामावर पोहोचायला उशीर होतो. अनेकदा लोकल रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होते. गेल्या अनेक वर्षात हीच स्थिती आहे. सकाळच्या वेळेत बदलापूरहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांना मोठी गर्दी असते. फर्स्टक्लास असो वा जनरल. सकाळी ६ ते ११ या वेळेत गाडीत चढणं हे मोठं अवघड काम. त्यात एखादी अननुभवी व्यक्तीने या वेळात लोकलचा प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मनाल लोकल प्रवाशाची दहशत बसेल. मात्र बदलापूरकर दररोज असा प्रवास करीत असतात. 

ठाणे-कल्याण सर्वाधिक गर्दीची स्टेशनं...

केवळ बदलापूरचं नाही तर सेंट्रल रेल्वेच्या दादर, ठाणे, कल्याण या स्थानकावर नेहमीच तुडूंब गर्दी असते. ठाणे स्टेशनवरुन चढणं अन् उतरणं म्हणजे दिव्यच. कल्याण स्टेशनवरुन मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे मुंबईहून कर्जत-खोपोली किंवा कसाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल कधी कोणत्या प्लॅटफॉर्मला थांबेल काहीच सांगता येत नाही. अशावेळी प्रवाशांनी मात्र ब्रिजवर तासनतास ताटकळत उभं राहायचं आणि घोषणा केल्यानंतर धावाधाव करायची. दुसरं म्हणजे कल्याण स्थानकात लोकलचा थांबा हा निश्चित नसतो. तो सिग्नल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवरुन ठरतो. मग कधी कधी तर कल्याण स्थानकावरच ३० ते ४० मिनिटं लोकल उभी असते. 

नक्की वाचा - Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठं गिफ्ट! 4 नव्या लोकल फेऱ्या सुरू, कसं असेल वेळापत्रक?

सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा...

लोकल सेवेचा नेहमीचा गोंधळ असला तरी बदलापूरकरांना इतर सार्वजनिक वाहतूक सेवेकडून दिलासा मिळत नाही. बदलापूरहून थेट मुंबईसाठी बसेस नाहीत. नवी मुंबईला जायचं असेल तरी बसेसची संख्या मर्गादित. सकाळी १० नंतर सायंकाळपर्यंत बस सुटत नाही. अगदी बदलापूरहून कटईपर्यंतही बस सेवा नाही. इतकच काय तर रिक्षा मिळणंही कठीण होतं. त्यामुळे बदलापुरातून मुंबईला जायचं असेल तर लोकल शिवाय पर्याय नाही. 

सेंट्रलचा नवरा नको रे बाबा...

ही परिस्थिती केवळ बदलापूरची नाही. तर सेंट्रल रेल्वेचा सावळा गोंधळ नियमित प्रवाशांना सहन करावा लागतो. वाढत्या गर्दीमुळे अगदी रात्री १० वाजेपर्यंतच्या गाड्यांना तुफान गर्दी असते. लोकलमधील गर्दी पाहून वेस्टनच्या (Western Railway) मुली सेंट्रलचं स्थळ स्वीकारत नाहीत, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत. चेतना देवरुखकरच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेंट्रल रेल्वेचं एक भीषण वास्तव समोर आलं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com