अमजद खान, प्रतिनिधी
Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीपला बुधवारी (4 सप्टेंबर 2024) रात्री उशीरा कल्याणमधून अटक करण्यात आली. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. या घटनेनंतर जयदीप फरार होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी झाली कारवाई?
राजकोट गडावरील शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा शोध सुरु होता.पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आपल्या राहत्या घरातून पळून गेला होता. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेची बायको निशिगंधा हिच्याशी संपर्क साधला तेंव्हा ती तिच्या माहेरी असल्याचे त्यांना कळाले.सिंधुदुर्ग पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला होता.
जयदीप आपटे पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली होती. जयदीपच्या अटकेसाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी कल्याण रेल्वे स्टेशन आणि जयदीप आपटे यांच्या घराबाहेर दोन पोलीस पथक नेमली होती. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जयदीप आपटे बिल्डिंगच्या बाहेर आला आणि त्याला तिथं दबा धरुन बसलेल्या कल्याण पोलिसांच्या विशेष पथकानं ताब्यात घेतलं.अटकेनंतर तासाभरातच त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सिंधुदुर्ग पोलीस त्या घेऊन रवाना झाले आहेत.
( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )
सत्य बाहेर येणार!
या दुर्दवी प्रकरणातील आणखी एक आरोपी बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. चेतन पाटील हा कोल्हापुरचा रहिवाशी आहे. त्यामुळे मालवण पोलीसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले होते. पण तिथे चेतन पाटील सापडला नाही.तो फरार झाला होता. त्यामुळे चार दिवस हे पथक कोल्हापुरमध्येच होते.
कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या राहात्या घरी चेतन 29 ऑगस्टच्या रात्री आली होता. तो घरात घुसला त्यावेळी त्याच्यावर नजर ठेवून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला अटक केली. त्यानंतर आता जयदीप आपटेलाही अटक करण्यात आल्यानं या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : NDTV Exclusive : परवानगी घेतली 6 फुटांच्या मातीच्या मॉडेलची, पुतळा उभारला 35 फुटांचा )
छत्रपती शिवाजी महाराजांचा तो लोकार्पणापासून अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. या प्रकरणात मालवण बंदही करण्यात आला. तसंच विरोधी पक्षांनी मुंबईत सरकारला जोडे मारो आंदोलन देखील केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणात माफी देखील मागितली होती. तसंच या प्रकरणाचं राजकारण करु नये असं आवाहन केलं होतं.