Beed News : SIT पथकातही वाल्मिक कराडचे चाहते? संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट

बीडचे अधिकारी बीडचा तपास कसा करू शकतात, यातून निष्पक्ष तपास होऊ शकेल का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

मोहसिन शेख, प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी पथकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. एसआयटी पथकातील 2 अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील एक अधिकाऱ्यासोबत वाल्मिक कराडचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या एसआयटीवरुन आता नवा वाद सुरू झाला असून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही हा तपास निष्पक्ष कसा होईल असा सवाल उपस्थित करीत आहेत.  

या फोटोमध्ये एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडची गळाभेट घेत असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये एसआयटीतील पीएसआय महेश विघ्ने असल्याचं सांगितलं जात आहे. SIT मधील PSI महेश विघ्ने यांच्यासह पोलीस हवालदार मनोज कुमार वाघ यांचे आणि वाल्मिक कराडचे  जवळचे संबंध असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे. 

नक्की वाचा -  Santosh Deshmukh Murder : ही 10 जण लावणार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा, कशी आहे SIT?

Advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला असला तरी त्यातील सर्वच अधिकारी बीडचे असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या तपासावर मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. बीडचे अधिकारी बीडचा तपास कसा करू शकतात, यातून निष्पक्ष तपास होऊ शकेल का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. 

Advertisement

SIT पथकात कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश?
पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली  यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली असून या टीममध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Beed and Pune Connection: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात?

जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे एसआयटीवर सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी दोन फोटो ट्विट करीत एसआयटीवर सवाल उपस्थित केला आहे. या एसआयटीमधील पीएसआय महेश विघ्ने आणि पोलीस हवालदार मनोज वाघ यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यातील एका फोटोमध्ये महेश विघ्ने आणि वाल्मिक कराडचा फोटो समोर आला आहे. मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली दहा वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर विघ्ने यांनी निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केल्याचाही आव्हाडांनी उल्लेख केला आहे.