Mangesh Kalokhe Murder Case : रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेत हल्लेखोरांबाबत मोठा सुगावा लागला आहे.
खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे या उर्मिला देवकर (अजित पवार गट) यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. देवकर आणि काळोखे या दोन्ही कुटुंबात आधीपासून वैर होतं. त्यात पालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही कुटुंबाच्या घराशेजारी दोन दिवस पोलीस तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, काळोखे यांनीही उर्मिला देवकर यांचे पती रवींद्र देवकर यांना मारण्याची धमकी दिली होती.
काळोखे यांना मारण्याची दिली सुपारी...
पत्नीच्या अपयशाचा राग डोक्यात घेऊन रवींद्र देवकर यांनी मंगेश काळोखे यांना मारण्याची सुपारी दिली. त्यानुसार, २६ डिसेंबरला मंगेश यांच्यावर हल्ला करीत त्यांना जीवे मारण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये अनेकजण भर रस्त्यात काळोखे यांना मारत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळोखे यांच्या हत्येसाठी तिघांना सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.
एका आरोपीला पुण्यातून घेतलं ताब्यात...
काळोखे हत्याप्रकरणातील एका आरोपीला पुण्यातील वानवडी येथून अटक करण्यात आली होती. खालीद खलील कुरेशी (२३) एसं आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात सोनसाखळी चोरीचा आरोप आहे. सापळा रचून वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत मित्रांच्या मदतीने त्याने काळोखेंचा खून केल्याची कबुली दिली आहे.