उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. ही मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होती. शवविच्छेदन अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनीही सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या 3 मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला 18 नोव्हेंबर रोजी डॉक्टरकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?
हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? तिची फक्त हत्या झाली आहे? की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुष्कृत्य सुद्धा झालं आहे? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
ट्रेंडिंग बातमी - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?
यासाठी वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तर हे कृत्य ज्याने कुणी केलं आहे, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तर परिसरातील महिलांनीही चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. बदलापूर इथं काही दिवसापूर्वी चिमुकलीवर अत्याचार झाले होते. त्यानंतर त्या आरोपीचा इन्काऊंटर करण्यात आला होता.